उरण बाजारात करांदा फोडींना वाढती मागणी

उरण : रानावनात पावसाच्या पहिल्याच सरीने नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या विविध प्रकारच्या औषधी, गुणकारी रानभाज्या उरण बाजारात दाखल होवू लागल्या आहेत.त्यामुळे या रानभाज्यांकडे नागरिक आकर्षित होवू लागले आहेत. मात्र, विकासासाठी उरण मधील वनराई उध्वस्त करण्यात आली असल्याने दुर्मिळ झालेल्या रानभाज्यांचे दरही वाढले आहेत.

पावसाळ्यात सुरुवातीच्या काही ठराविक दिवसातच जंगल आणि शेताच्या बांधांवर नैसर्गिकरित्या विविध प्रकारच्या गुणकारी रानभाज्या उगवत असतात. रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. रानावनात उगवणारे कडू करांदे (कंद) प्रकारातील फळ अतिशय करवट असते. मात्र, विशिष्ट पध्दतीने फोडी करुन शिजवल्यानंतर करांदा फोडी गोड लागतात. औषधी आणि गुणकारी असल्याने नागरिक आनंदाने करांदा फोडी खरेदी करीत आहेत. सध्या ५० रुपयास एक वाटा या दराने कातकरी आणि आदिवासी करांदा फोडी विकत असून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस जंगलात उगवणाऱ्या वेलखालील  करांदे जमिनीतून खणून घरी आणतो, शिजवून घेतो. कडवटपणा जाण्यासाठी दोन ते तीन वेळा करांदे पाण्यात धुतो. त्यामुळे चवीला रुचकर लागल्यावर करांदे उरण बाजारात विकायला आणतो. सध्या ५० रुपयास १ वाटा या दराने करांदा फोडी विकतो. आवक वाढल्यावर करांदा फोडीचे दर कमी करतो, असे करंजा सातघरपाडा येथील कंद विक्रेत्या श्वेता सुनील कातकरी यांनी सांगितले.

वर्षातून एकदाच जंगलातील कंद खायला मिळतात. कंद रुचकर आणि नैसर्गिक असल्याने औषधी असतात. त्यामुळे नेहमी न विसरता पावसाळ्यात कंद खातो. - सौ. रजनी मानपूरे, पाल्याची वाडी -केगाव, उरण.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सफाई अपनाओ, बिमारी भगाओ अभियान