नरेंद्र पाटील यांना ‘विधान परिषद'ची उमेदवारी देण्याची मागणी

नवी मुंबई : येत्या १२ जुलै रोजी होणाऱ्या आगामी ‘विधान परिषद'च्या निवडणुकीसाठी ‘माथाडी युनियन'चे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना ‘भाजपा'च्या वतीने उमेदवारी द्यावी. नरेंद्र पाटील यांना ‘विधान परिषद'मध्ये शेतकरी, कामगार आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची संधी द्यावी, यासाठी माथाडी नेते आणि कामगारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना ‘विधान परिषद'ची उमेदवारी देण्याच्या मागणीसाठी २५ जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माथाडी नेते, कामगार-कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.

नरेंद्र पाटील लढवय्ये नेते आहेत. ते आजही एक पाऊल पुढे आहेत आणि उद्याही एक पाऊल पुढेच राहणार आहेत. नरेंद्र पाटील यांच्याकडे कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेल्या ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'चे अध्यक्षपद असून, उत्तरोत्तर त्यांनी ‘महामंडळ'च्या कार्याला प्रगतीपथावर नेले आहे. याचा निश्चितच विचार केला जाईल आणि त्यांना ‘भाजपा'च्या वतीने आगामी ‘विधान परिषद'च्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माथाडी कामगार-कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले. तसेच यापुढे नरेंद्र पाटील यांच्यावर याहीपेक्षा मोठी जबाबदारी सोपविली जाईल, असे आश्वासनही ना. देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.

तर माथाडी कामगार केंद्रबिंदू आहे. मला ‘विधान परिषद'वर घेण्याची मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली असली तरी त्याचबरोबर नवी मुंबईतील बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केट आणि इतर मार्केट आवारातील प्रश्न, नाशिक येथील बाजार समित्यांमधील माथाडी-मापारी कामगारांचा प्रश्न तसेच माथाडी कामगारांच्या इतर न्याय मागण्यांची सोडवणूक होणे आवश्यक आहे. सदर प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करीत आहोत, असे नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले.

याप्रसंगी माथाडी कामगार-कार्यकर्त्यांच्या या शिष्टमंडळामध्ये ‘माथाडी कामगार युनियन'चे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, ‘माथाडी पतपेढी'चे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील तसेच सेक्रेटरी आणि विविध विभागातील कामगार-कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 नवी मुंबईची पाणीकपात सहन करणार नाही