१७ ग्रामपंचायतींकडे घंटागाडी नसल्याची बाब उघड

नवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींकडे कचऱ्यासाठी घंटागाडीच नसल्याची धवकायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या हद्दीत रस्त्यावर आणि अन्यत्र कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसून येत आहे.

पनवेल तालुक्यात एकूण ७१ ग्रामपंचायती आहेत. मुंबईचे प्रवेशद्वार असलेले पनवेल तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींकडे घंटागाडी नाही. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती नसल्याने घंटागाडी घेता येत नाही. परिणामी, येथे कचरा वाढू लागलेला आहे. पनवेल तालुक्यात डम्पिंग ग्राऊंड नसल्याने कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कचरा कुठेही आणि कसाही रस्त्यावर, मोकळ्या जागेत फेकला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. शिवाय मच्छरांचे प्रमाण देखील वाढते.

पनवेलमध्ये कचऱ्याच्या समस्याने उग्ररुप धारण केलेले आहे. गावांमध्ये जाताना रस्त्यावर प्रचंड कचरा साचलेला दिसून येतो. येथील प्रत्येक गावाची परिस्थिती वेगळी नाही. येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आणि रहिवासी संख्या वाढत असल्याने कचऱ्याची समस्या देखील बिकट होत चालली आहे. एका ग्रामपंचायतने ७ ते ८ लाख रुपये खर्च करुन काही वर्षांपूर्वी घंटागाडी घेतली. मात्र, या घंटागाडीचा अद्याप उपयोग झालेला नाही. परिणामी, ती गंजू लागली आहे.

पनवेलच्या ग्रामीण भागात कचऱ्याची समस्या आ वासून उभी आहे. मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. मात्र, कचऱ्याच्या समस्येवर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. काही ठिकाणी ग्रामपंचायत कचरा उचलत असली तरी काही गावांमध्ये घंटागाडी येत नसल्याने नागरिकांच्या समोर कचऱ्याची समस्या तशीच कायमस्वरुपी आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. घराघरात तसाच कचरा साठून राहतो. अनेक नागरिक जाता-येताना कचरा ओढ्याच्या कडेला किंवा नदीत टाकतात.

देवळोली, दिघाटी, गिरवले, केळवणे, खैरवाडी, खानाव, मालडुंगे, मोरबे, नानोशी, नितळस, पोयंजे, साई, शिरवली, वाकडी, वलप, वाघिवली, वाजे या १७ ग्रामपंचायतींकडे घंटागाडी नसल्याची माहिती ‘पंचायत समिती-पनवेल'तर्फे देण्यात आली आहे. सदर १७ ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायती घंटागाडी घेण्यास सक्षम आहेत, तरी देखील घंटागाडी घेण्याकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.

घंटागाडी घेण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ट्राय सायकल लवकरच घेतल्या जातील. - संजय भोये, गटविकास अधिकारी - पनवेल. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘कडोंमपा'चा कारभार ठेकेदार चालवतात का?