अनधिकृत होर्डिग्जवर होत असलेल्या कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याची काँग्रेसची मागणी

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत होर्डिग्जवर होत असलेल्या कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करून पालिकेचा महसूल बुडविल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा  काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे एका  निवेदनातून केली आहे.

मुंबईतील घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवी मुंबई शहरातील अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई सुरु केलेली आहे, ही नक्कीच स्तुत्य बाब आहे. त्याबाबत आपले सर्वप्रथम अभिनंदन. या अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई करण्यासाठी लेखी मागणीची दखल घेतल्याने रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

शहरात ज्या ज्या ठिकाणी आपणास अनधिकृत होर्डिग्ज आढळून येतील, त्या सर्व होर्डिग्जवर तातडीने कारवाई करण्यात यावी. होर्डिग्ज ज्या दिवसांपासून लागले आहेत, त्या दिवसांपासूनचे शुल्क तातडीने जमा करण्यात यावे. अनधिकृत होर्डिग्ज लावून पालिका प्रशासनाचा महसूल बुडविल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच अनधिकृत होर्डिग्ज काढण्यासाठी जो खर्च येईल, तो संबंधितांकडून वसूल करण्यात यावा. शहरामध्ये किती अनधिकृत होर्डिग्ज होते, ते कोणाचे होते, ते हटविण्यासाठी किती खर्च आला, त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, कोणाकडून किती खर्च वसूल करण्यात आला, कोणाकोणावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले, याची  माहिती नवी मुंबईकरांना देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ठाणे मधील १५० शाळांमध्ये झाले सर्वंकष स्वच्छता अभियान