नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी गाजवली दक्षिण आफ्रिका

नवी मुंबई : जगातील सर्वात आव्हानात्मक आणि खडतर समजली जाणारी दक्षिण आफ्रिक्रा मधील कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन राज्यातील सनदी अधिकारी तथा नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. जगात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या ‘कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन'चे ८६.६ कि.मी. अंतर डॉ. कैलास शिंदे यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदात पूर्ण केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

चढण आणि उतार अर्थात अप ॲण्ड डाऊन या पध्दतीने कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाते. यावर्षी मॅरेथॉनचा मार्ग अपहिल म्हणजेच चढणीचा होता. या अंतर्गत १२ तासांत ५,९४३ फुट उंचीचे आणि ३,७९६ फुट उताराचे अंतर पार करायचे होते. समुद्रसपाटीपासून सदर अंतर जवळपास १८०० मीटर उंचीवर आहे. या मार्गातील लहान-मोठ्या २० ते २५ टेकड्या चढणे ‘मॅरेथॉन'मधील स्पर्धकांना बंधनकारक असते.  

विशेष म्हणजे गतवर्षी देखील डॉ. कैलास शिंदे यांनी ‘कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन'मध्ये सहभागी होऊन ती विहित वेळेत पूर्ण केली होती. त्यावेळी स्पर्धेचे स्वरुप उताराकडे होते. त्यावेळी त्यांनी ११ तास ६ मिनिटात सदर मॅरेथॉन पूर्ण केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची अपहिल मॅरेथॉन अधिक खडतर आणि कठीण होती, असे आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.  

मुंबई मॅरेथॉन सह महाराष्ट्रातील विविध मॅरेथॉनमध्ये नियमित सहभागी होणारे सनदी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी यावर्षी देखील ‘कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन'मध्ये सहभाग घेण्याचा निश्चय करुन तयारी सुरु केली होती. त्याअनुषंगाने काही महिन्यांपासून ते पहाटेच्या सुमारास नवी मुंबईतील रस्त्यांवर, डोंगररांगांवर सराव करत होते. ‘कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन'ची तयारी करीत असतानाच लोकसभा निवडणुकीत त्यांना बिहारमध्ये ऑर्ब्झवर म्हणून पाठवण्यात आले होते. तसेच ४ जून रोेजीच्या मतमोजणीच्या वेळेस त्यांना बिहारला पुन्हा जावे लागले होते. लोकसभा निवडणुकीचे कामकाज खंबीरपणे सांभाळत डॉ. कैलास शिंदे यांनी जागतिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होत विहित कालावधीमध्ये ती पूर्ण केल्याबद्दल त्यांचे नवी मुंबईत सर्वत्र कौतुक होत आहे.  

दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारित्झबर्ग ते डर्बन या दोन शहरादरम्यान ८६.६ कि.मी. अंतराची ‘कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन' पूर्ण करण्यासाठी १२ तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. डॉ. कैलास शिंदे यांनी ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदात ८६.६ कि.मी. अंतर पार करुन आपली क्षमता सिध्द केली आहे. शारीरिक, मानसिक, समर्पण आणि चिकाटी आदि गुणांची चाचणी म्हणून आपण ‘कॉम्रेडस्‌ मॅरेथॉन'कडे बघतो. - डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल-कर्जत लोकलसेवा दृष्टीपथात