पुनाडे धरणातील जलसाठा संपुष्टात

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

उरण : भर पावसाळ्यातील जून महिन्यातच पुनाडे धरण कोरडा पडत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे. उरण तालुक्यातील २५ हजार रहिवाशांना गेल्या ८ दिवसांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने जातीने लक्ष केंद्रित करुन रहिवाशांना टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ‘पुनाडे आठ गाव ग्रामीण नळ-पाणीपुरवठा कमिटी'च्या वतीने ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शेतीच्या सिंचनासाठी लघु पाटबंधारे विभागाने उरण तालुक्यातील पुनाडे ग्रामपंचायत हद्दीत सदर धरण (बंधारा) १९९१ साली बांधण्यात आला आहे. मात्र, या धरणाचे पाणी सिंचनासाठी उपयोगात येत नसल्यामुळे उरण पूर्व भागातील टंचाईग्रस्त ८ गावांना पुनाडे धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरण्याची योजना राबविण्याचा निर्णय ‘रायगड जिल्हा परिषद'ने घेतला. तेव्हापासून  १.७५ एमसीएम एवढी पाण्याची क्षमता असलेले पुनाडे धरण उरणच्या पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन, पाले, आवरे, गोवठणे, कडापे, पाणदिवे या गावांतील रहिवाशांची तहान ‘पुनाडे नळ पाणी पुरवठा योजना'च्या माध्यमातून भागवत आहे.

मागील वर्षी कोकण किनारपट्टीवरील उरण सारख्या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पुनाडे धरणात पाणीसाठा कमी प्रमाणात झाला आहे. त्यातच धरणातून होणारे पाण्याचे लिकेज, वाढती उष्णता यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने खाली गेली होती. आता तर भर पावसाळ्यातील जून महिन्यात उरण तालुक्यातील भागात पावसाने पाठ फिरविली असल्याने धरणातील उरलासुरला पाणी (जलाशय) साठा संपुष्टात येत असल्याने रहिवाशांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यातच माती मिश्रित पाण्यामुळे पंप बंद पडून पाणी पुरवठा बंद होत असल्याने भर पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याची रहिवाशांची ओरड आहे. त्यामुळे रहिवाशांना भेडसावत असणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच सदर रहिवाशांना टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ‘पुनाडे आठ गाव ग्रामीण नळ-पाणीपुरवठा कमिटी'च्या अध्यक्षा तथा ‘वशेणी'च्या सरपंच सौ. अनामिका हितेंद्र म्हात्रे यांनी ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

याप्रसंगी ‘सारडे गांव'चे सरपंच, ‘आवरे'च्या सरपंच तसेच कमिटी सदस्य प्रशांत म्हात्रे-पाले, अमित म्हात्रे-आवरे, संतोष पाटील उपस्थित होते.

उरण पूर्व विभागातील रहिवाशांना पुनाडे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, जून महिना संपत आला तरी पाऊस पडलेला नाही. त्यामुळे उरला-सुरला धरणातील जलसाठा संपुष्टात येत आहे. परिणामी, या परिसरातील रहिवाशांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून रहिवाशांना तात्काळ टँकरने किंवा हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

-सौ. अनामिका म्हात्रे, अध्यक्षा-पुनाडे आठ गाव पाणीपुरवठा कमिटी तथा सरपंच-वशेणी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिका तर्फे खारघरमध्ये विशेष करभरणा शिबीर