दिवाळेगाव खाडीकिनारी स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४' अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ' अभियान स्वच्छ भारत मिशन द्वारे जाहीर करण्यात आले असून, त्या अंतर्गत २९ जून रोजी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळेगाव येथे खाडीकिनारी विशेष स्वच्छता मोहीम स्थानिक नागरिकांच्या सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आली.

अलिकडेच महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केलेल्या मार्केट पाहणी दौऱ्यात दिवाळे मार्केटच्या भेटीप्रसंगी त्याठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्याबाबत सूचित केले होते. त्यास अनुसरुन २९ जून रोजी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली आणि प्रत्यक्ष सहभागातून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेत स्वच्छतेचे पालन करुन आरोग्याचे रक्षण करा, असा संदेश यावेळी प्रसारित करण्यात आला.

महापालिका उपआयुक्त (परिमंडळ-१) सोमनाथ पोटरे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग) डॉ.अजय गडदे यांच्यासह बेलापूर विभाग सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या सक्रिय सहभागातून संपन्न झालेल्या या मोहीमेत दिवाळे गावातील स्थानिक मच्छीमार, मासळी विक्रेत्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यासोबतच नेरुळ येथील एस.के.कॉलेज आणि विद्या प्रसारक कॉलेज मधील एनएसएस विद्यार्थीही या मोहीमेत उत्साहाने सहभागी झाले होते.  

यावेळी उपस्थितांनी सामुहिकरित्या माझी वसुंधरा अभियान तसेच स्वच्छता आणि प्लास्टिक बंदीची शपथ ग्रहण केली. या मोहीमेत प्लास्टिक, थर्माकोल आणि तत्सम इतर वस्तूंचा ५१ गोणी कचरा जमा करण्यात आला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत ‘सफाई अपनाओ-बिमारी भगाओ' अभियान