‘कचरा व्यवस्थापन'मध्ये  नागरिकांचा  सहभाग आवश्यक

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण, त्याची विल्हेवाट, नाल्यात टाकला जाणारा कचरा या सर्व पैलुंबाबत जनजागृती करुन ‘कचरा व्यवस्थापन'मध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग घेण्याची आवश्यकता यावर ठाणे महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले.

कचऱ्याबद्दल जास्तीत जास्त नागरिकांशी संवाद वाढवावा, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. या संवादासाठी स्थानिक तरुण-तरुणींचे गट, स्वयंसेवी संस्था, महिलांचे गट यांनी मदत घ्यावी, असेही आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार महापालिकेच्या ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'ने नुकतेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत संवाद सत्र आयोजित केले होते.

 उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार यांनी या संवाद सत्रात कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग यांच्याविषयी प्रास्ताविक केले. या सत्रास समर्थ भारत व्यासपीठ, स्त्री मुक्ती संघटना, परिसर भगिनी विकास संघ, सुनिलिमा सस्टेनेबल सोल्युशन्स, आरनिसर्ग फाऊंडेशन, एलएएचएस प्रतिष्ठान, ठाणे, रोटरी क्लब, ठाणे, ॲन्टी प्लास्टिक ब्रिगेड, पर्यावरण दक्षता मंडळ, ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन, हिरवं स्वप्न, हरियाली, स्वत्व-ठाणे आदि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरी गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 ‘कचरा व्यवस्थापन'साठी क्षमता वृध्दी असे स्वरुप असलेल्या या सत्रात, घरगुती खत निर्मिती, कचऱ्याचे वर्गीकरण, एकल वापराच्या प्लास्टिकवरील प्रतिबंध, घनकचरा व्यवस्थापन करणारी मोठी गृहसंकुले, त्यांचे अनुभव, ‘एनएसएस'च्या विद्यार्थांच्या मदतीने शाळा, महाविद्यालयातील जागृती, आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.

त्याचबरोबर नाल्यात कचरा न टाकण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची गरज असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सदर सत्रात आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्विकासाला टक्केवारीचे ग्रहण?