तबला-बासरीच्या जुगलबंदीत रंगले ऐरोलीकर

नवी मुंबई : ‘नादवेणू संगीत अकादमी'च्या वतीने ऐरोली येथे नमोस्तुते पर्व-२ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिध्द बासरी वादक पं. विवेक सोनार आणि तबलावादक उस्ताद फजल कुरेशी यांच्या सांगितीक जुगलबंदीने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. त्याचबरोबर ‘नादवेणू संस्था'च्या ६० बासरी वादक आणि २० हार्मोनियम वादकांनी विविध चित्रपटांतील गीते, लोकगीते, नाट्यसंगीत तसेच शास्त्रीय संगीतातील विविध रागांचे सादरीकरण करुन सदर संगीतमय सोहळ्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

ऐरोली, सेक्टर-५ येथील जानकीबाई मढवी हॉलमध्ये संपन्न झालेल्या या सर्वांग सुंदर कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. हार्मोनियमवर छोट्या विद्यार्थ्यांनी लकडी की काठी, अग्गोबाई ढग्गोबाई सारखी बालगीते वाजवून उपस्थितांची मने जिंकली. तब्बल २० हार्मोनियम वादक आणि ६० बासरी वादकांनी या कार्यक्रमात सहभाग घ्ोतला होता.

नाट्यगीतासारखा कठीण गीत प्रकार ‘नादवेणू'च्या विद्यार्थ्यांद्वारे बासरीवर सादर होत असताना मंत्रमुग्ध झालेल्या प्रेक्षकांनी उभे राहून त्यांना दाद दिली. तर अंकिता सुर्यवंशी यांच्या हार्मोनियम आणि आकाश सुर्यवंशी यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. त्यांना अर्णव आणि स्वप्नील भिसे यांनी तबल्यावर अप्रतिम साथ दिली.

कार्यक्रमाच्या अंतिम पर्वात सुप्रसिध्द बासरी वादक पं. विवेक सोनार आणि जगप्रसिध्द तबला वादक उस्ताद फझल कुरेशी यांच्यात तब्बल दीड तास रंगलेल्या जुगलबंदीने रसिक भारावून गेले.

४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती...

याप्रसंगी बासरी वादक पं. विवेक सोनार आणि जगप्रसिध्द तबला वादक उस्ताद फझल कुरेशी यांच्या हस्ते ४ विद्यार्थ्यांना ‘नादवेणू संगीत अकादमी'च्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून सोनार लिपी या नावाने नवीन डिजीटल लिपीचे उद्‌घाटन करण्यात आले. दरम्यान, वाद्यांच्या माध्यमातून संगीताची सेवा घडावी, असा या कार्यक्रमामागील मूळ उद्देश होता. रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता तो उद्देश साध्य झाल्याचे नमोस्तुते कार्यक्रमाचे आयोजक आकाश सुर्यवंशी यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पावसाळ्यात सर्पदंशाबाबत काळजी घेण्याचे सर्पमित्रांचे आवाहन