अंगारकी चतुर्थी निमित्त टिटवाळा महागणपतीला भक्तांचा महापूर

कल्याण : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने टिटवाळा येथील महागणपती मंदिरात भक्तांचा अक्षरशः महापूर उसळला. ५ मे रोजी पहाटेच्या सुमारासच मंदिर परिसरात हजारो भाविकांनी गर्दी करत बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. गणपती बाप्पा मोरयाच्या अखंड जयघोषांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. श्रध्दा, भक्ती आणि उत्साहाचा संगम अनुभवण्यासाठी मुंबई, ठाणे आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

यावेळी पहाटे ३ वाजता गणरायाला विधीवत दुग्धाभिषेक करण्यात आला आणि आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दरवाजे उघडताच दर्शनासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या. सकाळच्या पहिल्या प्रहरापासूनच मंदिरात भाविकांची वर्दळ वाढू लागली आणि सूर्योदय होताच गर्दीने वेग घेतला. प्रत्येक तासागणिक वाढणाऱ्या या गर्दीमुळे मंदिर परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण कायम राहिले.

मंदिर प्रशासनाने यंदा विशेष नियोजन करत सुरक्षा आणि दर्शन व्यवस्थेला प्राधान्य दिले होते. शिस्तबध्द रांगा, स्वयंसेवकांची तत्परता आणि पोलीस बंदोबस्त यामुळे एवढ्या मोठ्या गर्दीतही कोणतीही गैरसोय झाली नाही. भाविकांना शांततेत आणि समाधानाने बाप्पाचे दर्शन घेता आले. दुपारनंतर गर्दीने उच्चांक गाठल्याचे चित्र दिसून आले.

अंगारकीच्या या दिवशी टिटवाळा महागणपती मंदिर केवळ धार्मिक स्थळ न राहता भक्तीचा महासागर बनला होता. प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या दर्शनाचे समाधान आणि अंतर्मनात श्रध्देची प्रचिती स्पष्ट दिसत होती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी आराखडे सुसंगत करा