नवी मुंबई महापालिका मालमत्ताकर विभाग ॲक्शन मोडवर

मालमत्ताकर भरणा न केल्यास कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मालमत्ताकर विभागाकडून थकबाकीदारांविरुध्द जप्तीपूर्व नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे. एकूण थकबाकीदारांपैकी आतापर्यंत ६४५ नागरिकांना ७ दिवसांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. तर २१८ नागरिकांना ४८ तासांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. थकबाकीदारांनी तातडीने कर न भरल्यास पुढील टप्प्यात महापालिकाकडून प्रत्यक्ष जप्ती कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे.

मालमत्ताकर महापालिकेच्या महसूलाचा सर्वात महत्वाचा स्त्रोत असून यातूनच नागरिकांना विविध सेवा सुविधांची पूर्तता केली जाते. त्यामुळे कर भरण्याबाबत सातत्य नसल्यास त्याचा शहरातील विकासकामांवर परिणाम होतो. त्या अनुषंगाने थकबाकीदारांना दिलेली जप्तीपूर्व नोटीस, नागरिकांना दिलेली अंतिम सूचना आहे. जप्तीसारख्या कठोर कारवाया टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत करभरणा करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

सुलभ-सहज कर भरणा करण्यासाठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध

नागरिकांना करभरणा करण्यासाठी कोणत्याही महापालिका कार्यालयात जावे न लागता घरबसल्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने मालमत्ताकर विभागाने सर्व डिजिटल पेमेंट पध्दती उपलब्ध करुन दिल्या असून, त्याचा प्रचार आणि प्रसार प्रभावीपणे केला आहे. व्हॉट्‌सॲप चॅटबॉट (८२९१९२०५०४), My NMMC (माझी नवी मुंबई ) ॲप, महापालिकेची अधिकृत वेबसाईट www.nmmc.gov.in  तसेच प्रत्येक कर देयकावरील क्यूआर कोड (QR Code) स्कॅनींग तसेच फोन पे, जीपे अशा विविध युपीआय माध्यमांद्वारे पेमेंट करण्याच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मालमत्ताकर धारकांनी सुविधांचा लाभ घेऊन त्वरित करभरणा करावा आणि कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले, रिक्षाचालकांचा ‘कब्जा'