डोंबिवलीत गुलाबी रस्ता; पुन्हा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण; डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीमध्ये चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. डोंबिवली एमआयडीसीमध्ये अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता, तर आता केमिकलमुळे एमआयडीसीमधील संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे.


रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याचेही दिसून आले आहे. या केमिकलमुळे दुर्गंधी सुटली आहे, असे स्थानिकांनी सांगितले. २०२० साली याच गुलाबी रस्त्याचा विषय लागून धरला होता, त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली होती. आता ५ वर्षांनी पुन्हा सदरचा विषय पुढे आला असून अधिकारी वर्गाकडून लक्ष दिले जाणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशा प्रकारच्या बदलामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस तर ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता. आता थेट रस्त्यावर गुलाबी रंगाचा थर पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.


तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी २०२० मध्ये, रासायनिक कंपन्यांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जाणार नसतील आणि सुरक्षिततेचे व प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसतील, तर त्या कंपन्यांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, औद्योगिक सुरक्षा विभाग आणि अग्निशमन दलाने संयुक्त सर्वेक्षण करून १०७ कंपन्यांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी ३८ कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

या सर्वेक्षणानंतर काही कंपन्या स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आला. दरम्यान, ‘महाविकास आघाडी’चे सरकार बदलून राज्यात त्यानंतर ‘महायुती’चे सरकार आले. ‘महायुती’च्या सरकारने कंपन्या स्थलांतराच्या विषयावर पुनर्विचार करण्याचे भाष्य केले होते. त्यानंतर पुढे काहीही कार्यवाही झालेली नसल्याने प्रदूषणाचा प्रश्न काही अद्याप सुटलेला नाही. त्याची पुन्हा एकदा प्रचिती रस्ता गुलाबी झाल्यानंतर आली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

न्याय आणि नात्यांचा समन्वय!