छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
पोलीस बनून लुटणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात;
नवी मुंबई : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना लुटणाऱया एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने मोठया शिताफीने पुण्यातून अटक केली आहे. सज्जाद गरीबशहा इराणी (47) असे या आरोपीचे नाव असून त्याने नवी मुंबईसह इतर भागात केलेले 16 पोलीस बतावणीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेने या तोतया पोलिसांकडुन तब्बल सव्वा कोटी रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. मोक्का कायद्यातंर्गत अटकेत असलेला आरोपी सज्जाद इराणी याच्यावर 100 हून अधिक गुन्हे दाखल असून तो नुकताच जेलमधून सुटून आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा पोलीस बतावणीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली होती.
गत 31 जुलै रोजी आरोपी सज्जाद इराणी याने पोलीस अधिकारी असल्याचे भासवून खारघर मध्ये राहणारे पवनकुमार केजरीवाल (68) यांच्याजवळचे दिड लाख रुपये किंमतीचे दागिने लुबाडून नेले होते. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने घटनास्थळ व आजुबाजुच्या परिसरातील तसेच आरोपीच्या लोणावळा-पिंपरी चिंचवड मार्गावरील सुमारे 20 ते 25 दिवसांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या तपासणीत गुन्हे शाखेने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीच्या मोटारसायकलचा माग काढत पुणे येथे जाऊन आरोपी सज्जाद गरीबशहा इराणी याचा शोध सुरू केला होता.
यावेळी त्याची पत्नी फिजा सज्जाद इराणी ही चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जात असताना पोलिसांच्या हाती लागली. त्यावेळी पोलिसांनी फिजा इराणी हिच्या ताब्यातून 1186 ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तसेच बनावट आयडी कार्ड, आधारकार्ड आणि पॅनकार्ड असा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा कक्ष-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ देसाई, पोलीस उपनिरीक्षक देशमुख व त्यांच्या पथकाने आरोपी सज्जाद याचा माग काढत 28 ऑक्टोबर रोजी त्याला पुण्यातील कोंढवा परिसरातून अटक केली.
त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी सज्जाद इराणी याने त्याच्या साथीदारांसह नवी मुंबई परिसरात 15 आणि जळगावमध्ये 1 असे एकुण 16 पोलीस बतावणीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपी सज्जाद इराणी याला अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली. आरोपी सज्जाद याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.