छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या लक्षात घेऊन तेथील खाटांची संख्या वाढवून ९० करण्यात आली आहे. याशिवाय, मुंब्रा येथील प्रसूतिगृहाकडून येणाऱ्या रुग्णांचा ओघ लक्षात घेऊन स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयातील एम. एम. व्हॅली प्रसुतीगृहास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विस्तारीत केंद्राचा दर्जा देऊन तेथे अद्ययावत प्रसुतीशास्त्र विभाग पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसुतीशास्त्र विभागात दररोज सुमारे २०० बाह्यरुग्ण येतात. तसेच प्रसुती पश्चात कक्षात आता एकूण ७० खाटा उपलब्ध आहेत. उपरोक्त विभागात दररोज सरासरी १८ प्रसुती होतात. ऑक्टोबर २०२५ मध्ये दररोज २२ प्रसुती झाल्या. त्याचबरोबर बहुतांश वेळा सदर कक्षात एकूण ९८ महिला दाखल होत्या. रुग्णालयात ठाणे महापालिका क्षेत्र तसेच आजुबाजुच्या क्षेत्रातून तसेच ठाणे ग्रामीण आणि पालघर ग्रामीण क्षेत्रातून महिला प्रसुतीसाठी येतात. त्यामुळे बहुतांश वेळा खाटा पूर्णपणे भरलेल्या  असतात. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासंदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात नुकती बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट आणि रुग्णालय अधीक्षक डॉ. अनिरुध्द माळगांवकर उपस्थित होते.

बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसुती विभागावर येत असलेल्या ताणाची सविस्तर चर्चा झाली. त्याची कारणमिमांसा करताना दरमहा सुमारे १०० प्रसुतीपूर्व महिला या स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालय येथील प्रसुतीगृहातून पाठवल्या जात असल्याचे निदर्शनास आले. या प्रसुतीगृहात आप्तकालीन सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास तेथून प्रसुतीसाठी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवणे कमी होईल. त्यातून प्रसुती विभागावर असलेला ताण कमी होऊन तेथे खाटा उपलब्ध होतील, असे अधिष्ठाता डॉ. बारोट यांनी सांगितले.  

त्यानुसार स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालय येथील प्रसुतीगृहात लवकरात लवकर अद्ययावत प्रसुती सुविधा सुरू करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ नियुक्त करणे, साधनसामुग्री घेणे आदि कामांचा आराखडा सादर करावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. दरम्यान, सदर प्रसुती विभाग,  छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे विस्तारीत केंद्र म्हणून जलद सुरु करण्याचेही निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली