छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
डेब्रीज माफियांविरोधात सिडकोची धडक कारवाई
नवी मुंबई : सिडकोच्या जागेवर मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असलेले डेब्रीज टाकणाऱया तसेच नैसर्गीक मातीचे उत्खनन करुन त्याची चोरी करणाऱयाविरोधात देखील सिडकोने सन 2022 ते 2025 या गत 4 वर्षामध्ये महिन्यात धडक कारवाई करुन एकुण 90 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच 247 आरोपींना अटक करुन 233 ट्रक-डंपर्स व 4 जेसीबी, पोकलन आणि डोझर जप्त केले आहेत.
मुंबईसह आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु असून या कामाच्या ठिकाणावरुन निघणारे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असलेले डेब्रीज काही व्यक्तींकडुन सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेमध्ये तसेच त्याच्या आजुबाजुच्या परिसरामध्ये अनधिकृतपणे टाकण्यात येत आहे. तसेच काही व्यक्तींकडुन नैसर्गीक मातीचे उत्खनन करुन त्याची देखील चोरी करण्यात येते. या प्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.
त्यानुसार सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाचे अभियंते, अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक, अधिकारी व अभियंते तसेच सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांच्या पथकाने गत चार वर्षभरामध्ये विषेश मोहिम राबवून सिडकोने संपादित केलेल्या जागेवर मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असलेले डेब्रीज टाकणाऱयांविरोधात धडक कारवाई केली. या विशेष मोहीमेदरम्यान सिडकोच्या जागेवर अनधिकृत डेब्रीज टाकणाऱया विरोधात विविध पोलीस ठाण्यात 90 गुन्हे दाखल करुन 247 आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या एकुण कारवायांमध्ये 233 ट्रक-डंपर्स, 4 जेसीबी,पोकलन व डोझर आदी वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.
या कारवाईप्रमाणेच सिडकोच्या जागेवारील नैसर्गिक माती उत्खनन करुन चोरी केल्याप्रकरणी 2023 मध्ये 3 गुन्हे दाखल असून यात 1 कोटी 30 लाख 75 हजार रुपये किंमतीची माती चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.
सुरेश मेंगडे (मुख्य दक्षता अधिकारी सिडको)
सिडकोच्या परिक्षेत्रात विकासकामे प्रगतीपथावर असून सिडको परिसरात मानवी आरोग्यास हानीकारक अशा प्रकारचा कचरा, बांधकामाचा राडारोडा, उत्खननातील दगडमाती टाकण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कोणी आढळल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रीज टाकताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashrta.gov.in या वेबसाईट वर तसेच संबंधीत पोलीस ठाण्यास माहिती द्यावी.