नवी मुंबई विमानतळ मधील नोकऱ्यांमध्ये ८० टक्के नोकऱ्या स्थानिक, मराठी भाषिकांनाच द्या 

नवी मुंबई : नुकत्याच उद्‌घाटन झालेल्या दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये ८० टक्के नोकऱ्या स्थानिक, मराठी भाषिक तरुणांनाच मिळाल्या पाहिजे यासाठी ‘मनसे'ने रणशिंग फुंकले आहे. या विषयासाठी ४ नोव्हेंबर रोजी ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल आणि रोजगार विभागाचे उपायुक्त सचिन जाधव यांची ‘मनसे'चे प्रवक्ते तथा शहरअध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली.

‘सिडको'कडून माहिती अधिकारात मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात स्थानिक आणि मराठी भाषिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भात ‘सिडको'ने कोणतेही धोरण आखले नाही. तसेच आतापर्यंत या प्रकल्पात किती स्थानिक मराठी भाषिकांना समाविष्ट केले याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. याचा जाब सह-व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांना विचारण्यात आला. यावेळी शांतनू गोयल यांनी भूमीपुत्रांसाठी कौशल्य रोजगार विभागासोबत मिळून प्रशिक्षण कार्यक्रम सुरु असल्याची माहिती दिली. तसेच स्थानिकांना जास्तीत जास्त नोकरीत समाविष्ट करुन घेण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन ‘मनसे'ला दिले.

मनसे शिष्टमंडळाने कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता विभागाचे उपायुक्त सचिन जाधव यांची देखील भेट घेतली. रोजगार विभाग यांच्या अनास्थेमुळे मराठी तरुणांना विमानतळ प्रकल्पात नोकरी मिळत नसल्याबाबत यावेळी नाराजी व्यक्त केली. तसेच येत्या काही दिवसांत याबाबत कौशल्य, रोजगार विभागाने कार्यवाही नाही केली तर मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा गजानन काळे यांनी दिला.

‘मनसे'च्या शिष्टमंडळात गजानन काळे यांच्यासह मनसे पनवेल शहरअध्यक्ष योगेश चिले, नवी मुंबई उपशहरअध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, विलास घोणे, अभिजीत देसाई, मनसे रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, मनपा शहरअध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे, महिला सेना शहरअध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, विद्यार्थी सेना शहरअध्यक्ष संदेश डोंगरे आणि विभाग अध्यक्ष भूषण कोळी, अमोल आयवळे, अक्षय भोसले, आदि उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन