अंबरनाथ उपनगराध्यक्षपदी ‘शिवसेना-राष्ट्रवादी'चे सदाशिव पाटील
अंबरनाथ : ‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या उपनगराध्यक्षपदासाठी रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत ‘शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युती'चे ज्येष्ठ नगरसेवक सदाशिव पाटील यांनी बाजी मारली आहे. १२ जानेवारी रोजी नगरपरिषद मुख्यालयातील सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत सदाशिव पाटील यांनी ‘भाजपा पुरस्कृत महाआघाडी'चे उमेदवार प्रदीप पाटील यांचा ४ मतांनी पराभव केला. या विजयामुळे गेल्या १० दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर अखेर पडदा पडला असून, या संपूर्ण प्रक्रियेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा ‘किंगमेकर' म्हणून उदयास आले आहेत.
५९ सदस्यीय ‘अंबरनाथ नगरपरिषद'मध्ये कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सदर निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. खा. श्रीकांत शिंदे यांच्या कुशल नियोजनामुळे आणि प्रभावी रणनीतीमुळे ‘शिवसेना'च्या २८ नगरसेवकांनी एका अपक्ष सदस्यासह ‘राष्ट्रवादी'च्या सदाशिव पाटील यांना भक्कम पाठिंबा दिला. सदाशिव पाटील यांना एकूण ३२ मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या प्रदीप पाटील यांना २८ मतांवर समाधान मानावे लागले. ‘भाजपा'च्या १४ नगरसेवकांसह ‘काँग्रेस'चे १२, एक अपक्ष आणि नगराध्यक्षांचे मत मिळूनही ‘भाजप-काँग्रेस आणि अंबरनाथ विकास आघाडी'ला विजयाचा जादुई आकडा गाठता आला नाही.
‘काँग्रेसे'मधून निलंबित झाल्यानंतर ‘भाजपा'च्या गोटात सामील झालेले प्रदीप पाटील यांना या पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे ‘शिंदे सेना'ने ‘राष्ट्रवादी'शी यशस्वी हातमिळवणी करत ‘भाजपा'च्या महत्त्वाकांक्षेला लगाम लावला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने नगरपरिषद मुख्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. कडक सुरक्षेत पार पडलेल्या या प्रक्रियेनंतर सदाशिव पाटील यांच्या विजयाचा जल्लोष कार्यकर्त्यांनी साजरा केला. याच सभेत ५ नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती देखील जाहीर करण्यात आली, ज्यामुळे ‘नगरपरिषद'मधील सत्तेचे समीकरण आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.
उपनगराध्यक्ष म्हणून सदाशिव पाटील यांची निवड होताच खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आदिंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.