देशातील पहिला आयकॉनिक इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना नवी मुंबईत उभारण्याच्या प्रक्रियेला सिडकोची सुरुवात

नवी मुंबई : भारतातील करमणूक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत सिडकोने देशातील पहिल्या आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेनाच्या उभारणीची प्रक्रिया अधिकृतरीत्या सुरू केली आहे. 20,000 आसन क्षमता आणि 25,000 उभ्या प्रेक्षकांची व्यवस्था असलेल्या या जागतिक दर्जाच्या अरेनामुळे नवी मुंबई ‘लाईव्ह एन्टरटेनमेन्ट रेव्होल्यूशन’चे केंद्रस्थान ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सिडकोतर्फे ‘स्वारस्य अभिव्यक्ती’ (EOI) जारी करण्यात आली असून 9 डिसेंबरपासून दस्तऐवज ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025, संध्या. 5 वाजेपर्यंत आहे.

मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि ओटू अरेनाची प्रेरणा

न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन आणि लंडनच्या ओटू अरेनाच्या धर्तीवर विकसित होणारा हा प्रकल्प देशातील करमणूक पायाभूत सुविधांसाठी नवा मानदंड ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय संगीत मैफिली, क्रीडा स्पर्धा, भव्य सांस्कृतिक उत्सव आणि आभासी अनुभव यांसाठी हा अरेना केंद्रबिंदू राहील.

रोजगार, पर्यटन आणि नव्या उद्योगांना चालना

या अरेनाच्या उभारणीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून पर्यटन आणि ऑडिओ-व्हिज्युअल उद्योगांना नवसंजीवनी मिळणार आहे.

सिडको उद्योगातील शीर्ष भागीदारांसोबत काम करून जागतिक तंत्रज्ञान आणि परिचालन ज्ञान भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात झाल्याने ‘भारताची थेट करमणुकीची राजधानी’ म्हणून नवी मुंबईला मिळणारे नवे स्थान अधिकच बळकट होत असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र म्हणून विकसित करणे हा सिडकोचा अभिमानाचा विषय आहे. हा अरेना म्हणजे सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांतीची सुरूवात असून कलाकार, उद्योजक आणि स्थानिक उद्योगांसमोर मोठ्या संधींचे दरवाजे उघडणार आहेत,” असे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

7 हजारहून अधिक नागरिकांच्या सहभागातून ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ यशस्वी