नगरपालिका-स्टारलाईट वादात नागरिकांची गैरसोय
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका आणि एलईडी पथदिव्यांचे काम पाहणाऱ्या स्टारलाईट कॉम्पोनंटस् लि. या कंपनीमधील बिलांच्या थकबाकीवरून सुरू असलेल्या तीव्र वादामुळे शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती ठप्प झाली आहे. परिणामी, शहराचा मोठा भाग अंधारात असल्याने नागरिकांना असुरक्षिततेचा आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
स्टारलाईट कंपनीने आपली बाजू मांडताना नगरपालिकेने मासिक बिल वेळेवर दिले नसल्याने त्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. यामुळे दुरुस्तीचे काम प्रभावित झाले असल्याचे म्हटले आहे. तर नगरपालिका प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट करताना कंपनीच्या कामात असलेल्या गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे.
दरम्यान, या संदर्भात कंपनीला आम्ही वारंवार नोटीस बजावल्या असल्याचे नगरपालिकेच्या विद्युत विभागाचे म्हणणे आहे. तसेच आम्ही आमची बाजू उच्च न्यायालयात मांडली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात बंद असलेल्या पथदिव्यांच्या प्रश्नावरून ‘भाजपा’तर्फे अनेकदा आंदोलन करण्यात आले होते. बंद पथदिव्यांमुळे अपघात, चेन स्नॅचिंग, महिलांची छेडछाड असे प्रकार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्टारलाईट कॉम्पोनंटस् लि. ची बाजू: कंपनीने करारातील विसंगती (खांबांची वाढलेली संख्या), कोव्हीडनंतर अतिरिक्त खांबांच्या देखभालीचा भार, तसेच निकृष्ट साहित्याचा वापर आणि तांत्रिक बिघाडांसाठी नगरपालिका आणि महावितरण यांच्याकडून सहकार्य न मिळाल्याने समस्या वाढल्याचे सांगितले आहे. थकबाकी आणि करारातील अस्पष्टतेमुळे कंपनीने आपल्या हिताचे रक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाची बाजू: शहरातील पथदिवे दुरुस्तीचे काम अत्यंत संथ आणि बेजबाबदारपणे सुरू आहे. यामुळे ५०% शहर अंधारात आहे. हेल्पलाईन नंबर बंद ठेवल्याने नागरिकांच्या तक्रारी स्वीकारल्या जात नाहीत. तसेच कंपनी कोणत्याही पत्राचे उत्तर किंवा खुलासा देत नाही. नागरिकांच्या तक्रारीनुसार शहरातील बंद पथदिव्यांमुळे अपघात, चेन स्नॅचिंगसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नगरपालिकेने कंपनीला साहित्य साठा उपलब्ध करणे, कर्मचारी वाढवणे आणि दोन शिफ्टमध्ये काम सुरू करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा दिला होता.