पाऊस लांबल्याने फ्लेमिंगो पक्षांचे आगमन लांबणीवर?

वाशी: दरवर्षी हिवाळ्यात नवी मुंबई शहरातील पाणथळ क्षेत्रात परदेशी पाहुणे म्हणजेच फ्लेमिंगो पक्षांचे आगमन होते. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने फ्लेमिंगो पक्षांचे आगमन देखील लांबणार आहे, अशी माहिती ऐरोली येथील 'किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र' मधील अधिकाऱ्यांनी दिली.

मागील काही वर्षांपासून नवी मुंबई शहरात फ्लेमिंगो पक्षांचे आगमन होत असल्याने या पक्षांना पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. फ्लेमिंगो पक्षांचे जवळून निरीक्षण करता यावे म्हणून ऐरोली येथील 'किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र' तर्फे फ्लेमिंगो बोट सफारीची व्यवस्था करण्यात आली आहे. या बोटीतून पर्यटकांना ठाणे खाडीतील फ्लेमिंगो पक्षी पाहता येतात. फ्लेमिंगो पक्षी इराण, अफगाणिस्तान आणि इस्त्रायलमधून भारतातील विविध पाणथळ क्षेत्रात हिवाळा ऋतू दरम्यान येत असतात. भारतात सर्वप्रथम गुजरात मधील कच्छ येथील पाणथळ क्षेत्रात फ्लेमिंगो पक्षांचे आगमन होते. गुजरात, कच्छनंतर फ्लेमिंगो पक्षांचा पुढील मुक्काम नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्र असतो. त्यामुळे फ्लेमिंगो पक्षांच्या आगमनाची चाहूल लागताच त्यांना पाहण्यासाठी पक्षी प्रेमी, पर्यटकांची पाऊले वळत असल्याने फ्लेमिंगो पक्षांच्या आगमनाची प्रतीक्षा पर्यटकांना लागली आहे. मात्र, यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी देखील पाऊस सुरूच राहिला. त्यामुळे यंदा फ्लेमिंगो पक्षांचे आगमन देखील लांबणार असल्याची माहिती ऐरोली येथील 'किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र' च्या अधिकाऱ्यांनी दिली.

ऐरोली येथील 'किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र' च्या फ्लेमिंगो बोटीतून ठाणे खाडीतील फ्लेमिंगो पक्षांचे जवळून निरीक्षण करता येते. त्यामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबई शहरात कधी येतील, याची प्रतीक्षा करत आहोत. - अवधूत मोरे, पक्षी प्रेमी - नवी मुंबई.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना जाहीर