उरण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दुहेरी भेट
उरण : ‘मध्य रेल्वे'च्या बेलापूर-उरण रेल्वेमार्गावरील प्रवाशांना आता दुहेरी भेट मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावर १० फेऱ्या वाढवण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. त्याचबरोबर तरघर आणि गव्हाण या दोन रेल्वे स्थानकांची कामे देखील पूर्ण झाली आहेत. फेऱ्या वाढीसह नवीन स्थानके याच महिन्यात सुरू करण्याच्या हालचाली ‘मध्य रेल्वे' प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. नवी मुंबई विमानतळाजवळ तरघर रेल्वे स्थानक असल्याने त्याचा फायदा प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांना होणार आहे.
‘मध्य रेल्वे'च्या मुख्य, हार्बर, ट्रान्स-हार्बरच्या तुलनेत नेरूळ-बेलापूर-उरण मार्गावर लोकल फेऱ्या अत्यंत कमी आहेत. उरण मार्गावर प्रवासी संख्या वाढत असतानाही, लोकल फेऱ्या वाढवण्यात आलेल्या नाहीत. उरण मार्गावर दीड तासाच्या अंतराने लोकल उपलब्ध आहेत. यामुळे लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात आली आहे. यासंदर्भात ‘उरण'चे आमदार महेश बालदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला आहे. सीवूड्स-बेलापूर-उरण मार्गावर ५ अप आणि ५ डाऊन लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार असून त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.
यासह तरघर आणि गव्हाण अशी दोन स्थानके देखील सुरू करण्यात येणार आहेत. दोन्ही रेल्वे स्थानकांमधील कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे याच महिन्यात लोकलच्या फेऱ्या आणि स्थानके एकाचवेळी खुली करण्यात येणार आहेत, असे ‘मध्य रेल्वे'च्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
उरण-नेरूळ-बेलापूर मार्गावर सुरुवातीला १० अप आणि १० डाऊन लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन होते. मात्र, प्रवासी तिकीट विक्री आणि प्रवासी संख्या लक्षात घेता एकूण १० लोकल फेऱ्या वाढवण्यावर एकमत झाले आहे. यामुळे उरण मार्गावरील एकूण फेऱ्यांची संख्या ४० वरून ५० वर पोहोचेल. वाढीव फेऱ्यांमुळे दोन फेऱ्यांमधील अंतर कमी होण्यास मदत होणार आहे, असे देखील रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
जासई ग्रामस्थांची मागणी: उरण तालुक्यातील प्रवासी नागरिकांच्या हितार्थ मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय योग्य घेतला असला तरी, जासई गावाजवळील गव्हाण रेल्वे स्टेशनचे नाव रेल्वे प्रशासनाने बदलून गव्हाण-जासई रेल्वे स्टेशन असे करण्याची जासई ग्रामस्थांची मागणी आहे.
- संतोष घरत, सरपंच - जासई ग्रामपंचायत.