थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी अभय योजना जाहीर

भिवंडी : भिवंडी महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कर वसुली नेहमीच कमी राहिली आहे, ज्यामुळे आर्थिक विकासाला खीळ बसली आहे. त्यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने या आर्थिक वर्षातील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी व्याजदरात सूट देणाऱ्या पहिल्या ‘अभय योजने’ची घोषणा केली आहे. याबाबत उपायुक्त (कर) बाळकृष्ण क्षीरसागर यांच्या स्वाक्षरीने पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या मिळकतींवरील मालमत्ता कराची वसुली करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या तरतुदीनुसार अनुसूची ‘ड’ चे प्रकरण ८ (कराधान नियम) मधील नियम ५१ अन्वये मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये व्याजात सूट देण्याकरिता अभय योजना २०२५-२०२६ लागू करण्यात आली आहे. यामध्ये तीन टप्प्यात व्याजदरात सूट देण्यात आली आहे:

  • ७ ते ३० नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण कर भरणाऱ्या करदात्यांना व्याजामध्ये १०० टक्के शास्तीमध्ये सूट देण्यात येणार आहे.

  • १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान संपूर्ण कर भरणाऱ्या करदात्यांना व्याजामध्ये ७५ टक्के शास्तीमध्ये सूट देण्यात येणार आहे.

  • १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान संपूर्ण कर भरणाऱ्या करदात्यांना व्याजामध्ये ५० टक्के शास्तीमध्ये सूट देण्यात येणार आहे.

महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी व्याजदरात सूट देणाऱ्या ‘अभय योजने’चा लाभ घेऊन थकीत मालमत्ता कर भरावा. ऑनलाईन कर भरणा करण्यासाठी मालमत्ताधारकांनी https://taxbhivandimcorporation.in वेबसाईटचा वापर करावा. पुढील होणारी कायदेशीर कारवाई टाळून महापालिकेच्या आर्थिक विकासास हातभार लावावा असे आवाहन करण्यात येत आहे.

- अनमोल सागर, आयुक्त - भिवंडी निजामपूर महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नगरपालिका-स्टारलाईट वादात नागरिकांची गैरसोय