शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
इमानदार रिक्षाचालक' संतोष शिर्के!
नवी मुंबई : वाशी–कोपरखैरणे मार्गावर रिक्षा चालवणाऱ्या एका रिक्षाचालकाने प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत उदाहरण देत तब्बल १६ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग मूळ मालकाला परत केली आहे. संतोष शिर्के असे या रिक्षा चालकाचे नाव असून त्यांच्या प्रामाणिक कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच नागरिकांकडून त्यांना 'इमानदार रिक्षाचालक' अशी विशेष दाद देण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी संतोष शिर्के यांच्या रिक्षात बसलेला एक प्रवासी वाशी-जुहगाव दरम्यान चुकून त्याची सोन्याचे दागिने व कपडे असलेली बॅग विसरून गेला होता. ही बॅग रिक्षाचालक संतोष शिर्के यांच्या हाती लागताच त्यांनी कोणताही विलंब न लावता तत्काळ रिक्षा युनियन आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि मूळ मालकाचा शोध सुरू केला.
अखेर, जुहगाव येथील रहिवासी असलेले संतोष मोतलिंग हे सदर बॅगेचे मालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या आई काशी यात्रेवरून परत येत असताना ही बॅग रिक्षात विसरल्याचे समोर आले. या बॅगेत मंगळसूत्र, चार अंगठ्या, पैंजण आणि इतर दागिने मिळून सुमारे १६ लाख रुपयांचा ऐवज होता. रिक्षाचालक संतोष शिर्के यांच्या प्रामाणिकपणामुळे हा सर्व मौल्यवान ऐवज सुरक्षितपणे मूळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी संतोष शिर्के यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या प्रामाणिकतेची साक्ष देतात. "मला फक्त एवढंच वाटलं की, दुसऱ्याचं गमावलेलं परत मिळणं म्हणजेच खरी कमाई," असे ते म्हणाले. शिर्के यांच्या या कृतीमुळे सर्वसामान्य माणसाचा प्रामाणिकपणा आणि सचोटी आजही टिकून असल्याची सुखद जाणीव नवी मुंबईकरांना झाली आहे.
शिर्के यांच्या या कृतीबद्दल पोलिसांनी त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच रिक्षा युनियननेही त्यांचा सत्कार करून, इतरांसाठी एक आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.