शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
‘पर्यावरण दूत' निवडण्यासाठी विशेष जनजागृती उपक्रम
पनवेल : पनवेल महापालिकेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान ६.०' अंतर्गत आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि शाश्वत विकासासाठी विद्यार्थ्यांना आणि युवकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने पर्यावरण दूतांची निवड करण्यासाठी महापालिकेच्या विविध शाळांमध्ये नुकताच विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
या अभियानांतर्गत ६ नोव्हेंबर रोजी पनवेल महापालिका शाळा क्रमांक-११ आणि २ मध्ये, तसेच ७ नोव्हेंबर रोजी शाळा क्र. ७ आणि ४ मध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदल साक्षरता आणि स्वच्छतेचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या उपक्रमाद्वारे प्रत्येक शाळेतून उत्साही आणि जबाबदार विद्यार्थ्यांची ‘पर्यावरण दूत' म्हणून निवड करण्यात आली. पर्यावरण दूत पनवेल महापालिकासोबत विविध पर्यावरणीय उपक्रम, स्वच्छता मोहिमा आणि जनजागृती कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्ोणार आहेत.
पर्यावरण विभागाच्या वतीने उपायुक्त स्वरुप खारगे यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, या माध्यमातून तरुण पिढीमध्ये पर्यावरणपूरक विचारसरणी रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.