भाजीपाला उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल
उरण : उरण तालुक्यातील जमिनीला सोन्याचा भाव प्राप्त झाला आहे. शेती करण्यापेक्षा या जागेवर एखाद्या व्यवसाय अथवा प्रकल्प उभारण्याचा मानस शेतकऱ्यांचा अधिक दिसत आहे. त्यामुळे उरण तालुक्यात भातशेती लागवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. उरण तालुक्यातील चिरनेर पूर्व भागात भाजीपाल्यासह कडधान्य पिके अधिक घेतली जातात. सध्याच्या घडीला भाजीपाला उत्पादन कडधान्यापेक्षा जास्त घेतले जात आहे. आदिवासी ठाकूर जमात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पीक घेत आहे. कमी वेळ आणि कमी कष्टात जास्त नफा देणारी भाजीपाला पिके असल्याने, भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. शेतकरी भाजीपाल्यासह वाल, चवळी यांची लागवड मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र उरण तालुवयात दिसत आहे.
उरण तालुक्यात पडवळ, कारली, दुधी, घोसाळी, मिरची, वांगी, टोमॅटो, तोंडली या भाजीपाल्यांची लागवड शेतकरी करत आहेत. भाजीपाला पीक मोठ्या कालावधीचे पीक आहे. उत्पन्न देखील अधिक असून, उरण तालुक्यातील शेतकऱ्यांना पनवेल येथे बाजारपेठ उपलब्ध असल्याने भाजीपाला पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. कडधान्य ओलितांवर घेतले जाणारे पीक आहे. भाजीपाल्याच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने तसेच जंगली वानरांचा आणि मोकाट गुरांचा मोठा त्रास असल्याने कडधान्य उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.
जास्त उत्पन्न आणि पनवेल येथे बाजारपेठ उपलब्ध असल्याने कडधान्यांच्या तुलनेत भाजीपाला पिकविण्याकडे शेतकऱ्यांचा मोठा कल वाढत आहे. - कृष्णा अनंत म्हात्रे, शेतकरी- चिरनेर.
कडधान्याचे क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी वाल, चवळी, मूग, मसूर आदी कडधान्याची पेरणी केली आहे. शेतकऱ्यांचा कडधान्य पीक घेण्याकडे कल वाढावा यासाठी चिरनेर येथील श्रीमहागणपती सेंद्रिय शेती गटाला पेरणीसाठी फुले विक्रांत व्हरायटीचे हरभऱ्याचे ४१० किलो बियाणे दिले आहे. उरण तालुक्यातील कडधान्याचे क्षेत्र वाढावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. - सुषमा सुभाष अंबुलगेकर, कृषी सहाय्यक अधिकारी - उरण.