7 हजारहून अधिक नागरिकांच्या सहभागातून ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ यशस्वी
नवी मुंबई : स्वच्छ आणि सुंदर नवी मुंबईचा जागर करीत 7 हजाराहून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत पामबीच मार्गावर आयोजित 'स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन 2025' हा उपक्रम यशस्वी केला. हाफ मॅरेथॉनमधील सर्वाधिक 32 किमी. अंतराच्या मुख्य गटात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत: धावपटू म्हणून सहभागी होत नागरिकांसमवेत स्वच्छतेचा संदेश प्रसारित करीत ही हाफ मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली.
5, 10, 21 आणि 32 किमी अंतराच्या वेगवेगळ्या गटांमध्ये लेट्स सेलिब्रेट फिटनेस यांच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या सहयोगाने श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये विविध वयोगटातील स्त्री-पुरुष उत्साहाने सहभागी झाले होते. यामध्ये युवकांची संख्या लक्षणीय होती.
सकाळी 4.30 वा. या हाफ मॅरेथॉन मधील 32 किलोमीटर अंतराच्या गटाला सुरूवात होऊनही इतक्या पहाटे मोठ्या संख्येने आणि उत्साहाने धावपटू उपस्थित होते. नागरिकांनी उत्साही व उत्स्फूर्तपणे सहभागी होत स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉ़न उपक्रम यशस्वी केल्याबद्दल नागरिकांचे आभार व्यक्त करीत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिव्यांगांनीही सहभागी होत प्रेरणादायी उपस्थिती दर्शविली याचा विशेष उल्लेख केला.
स्वच्छ व पर्यावरणशील शहर ही नवी मुंबईची ओळख असून आरोग्यपूर्ण शहराचे ध्येय नजरेसमोर ठेवून आयोजित केलेल्या हाफ मॅरेथॉन उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल नागरिकांचे तसेच हाफ मॅरेथॉन आयोजनात सहयोग देणा-या लेट्स सेलिब्रेट फिटनेस आणि नवी मुंबई गुरुद्वारा सुप्रीम कौन्सिल व गुरुद्वारा श्री दशमेश दरबार आणि इतर सहयोगी संस्थांचे आयुक्तांनी आभार मानले.
याप्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांनीही आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. लेट्स सेलिब्रेट फिटनेस संस्थेच्या प्रमुख रिचा समित व नवी मुंबई गुरुव्दारा सुप्रीम कौन्सिलचे पदाधिकारी व त्यांचे सहकारी तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.