चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्ती कामाला सुरुवात
पनवेल : ‘सिडको'च्या नैना प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चिपळे पूल ते नेरे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ३ डिसेंबर पासून सुरु झाले आहे. चिपळे पूल ते नेरे रस्ता दररोजची वर्दळ असलेला रस्ता असून, या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि उखडलेल्या भागांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता चिपळे पूल ते नेरे रस्त दुरुस्ती कामाला सुरुवात झाली असून, प्रवासी, नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी आले आहेत.
पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला चिपळे पूल ते नेरे रस्ता सिडकोकडे हस्तांतरणानंतर नैना हद्दीत समाविष्ट झाला आहे. कायम वर्दळीचा रस्ता खराब झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांच्या मागणीला गांभीर्याने घेत ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना निवेदन देऊन चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीची दखल घेऊन ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी चिपळे पूल ते नेरे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरु झाले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारामुळे चिपळे पूल ते नेरे रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाल्याने नागरिकांना आता सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी दिलासा मिळाला असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.