थकीत पाणी बिल भरणाऱ्या नागरिकांना १०० टक्के सूट
ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह एक रकमी भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये (दंड/व्याज) १०० टक्के सूट लागू करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी १ डिसेंबर रोजी दिली.
थकीत पाणीपट्टी बिलावर १०० टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, नागरिकांनी पाणीपट्टी भरुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी केले आहे.
ठाणे महापालिका तर्फे पाणीपट्टी वसुलीची मोहिम हाती घेण्यात आली असून, पाणीपट्टी न भरणाऱ्या थकीत बिलधारकांचे नळसंयोजन खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असेही महापालिका आयुक्त सोरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.
थकीत पाणीपट्टी बिलावर १०० टक्के इतकी भरीव सवलत देण्याची योजना १ डिसेंबर पासून सुरु करण्यात आली असून, या योजनेची सांगता ३१ मार्च २०२६ रोजी होणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये (दंड/व्याज)१०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकणार आहेत. या धोरणात्मक निर्णयापूर्वी पाणी पुरवठा देयके जमा केलेल्या घरगुती पाणी बील धारकांना तसेच व्यवसायिक संयोजन धारकांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. ३१ मार्च २०२६ पर्यंत पाणी थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवणाऱ्या नागरिकांवर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करुन नळ संयोजन खंडीत करणे, मिटर रुम सिल करणे आणि पंप जप्ती, अशी कारवाई होईल, असे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.