स्वतःच्या अस्तित्वासाठी भाजपा प्रदेशाध्यक्षांवर दारोदारी फिरण्याची वेळ

कल्याण : ‘भाजपा'ने शिवसेना पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश दिल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून, ‘भाजपा'च्या या फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘भाजपा'च्या या पक्षप्रवेशाचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी चांगलाच समाचार घेतला. आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्षांवर दारोदारी फिरण्याची वेळ आली असल्याची टीका राजेश कदम यांनी केली आहे.  

ठाणे जिल्हा धर्मवीर आनंद दिघे, एकनाथ शिंदे आणि ‘शिवसेना'चा भक्कम बालेकिल्ला आहे. असे धक्के भरपूर पचवले आहेत. जगातील मोठा पक्ष म्हणवून घेणाऱ्या ‘भाजपा'चे प्रदेशाध्यक्षांना हातात गमछा घेऊन दारोदारी फिरुन पक्षात येता का? असे विचारण्याची वेळ आली आहे. शिवसेना शब्दाला जागणारी असून, ‘शिवसेना-भाजपा'च्या ‘महायुती'त भावाभावासारखे प्रेम आहे. मात्र, यामध्ये कोणीतरी मीठ टाकत असून कार्यकर्त्यांना आमिष दाखवले जात आहेत. ती त्यांच्यासाठी अतित्वाची लढाई असून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी फिरत असतील, असे राजेश कदम म्हणाले.  

शिवसेना-भाजपा नैसर्गिक युती असून आम्ही त्याचे पाईक आहोत. तर महापौर पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम ‘महायुती'ची भाषा करीत आहेत. मात्र, काही गल्लीबोळातील कार्यकर्ते महापौर फक्त ‘भाजपा'चाच बसणार, अशी भाषा करत असल्याची टीका उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केली.

तर आपले घर सोडून दुसऱ्याच्या घरात गेलेल्यांना लाख लाख शुभेच्छा. शिवसेना पक्षाची कल्याण-डोंबिवली मध्ये मोठी ताकद असून ‘फोडाफोडी'ची सुरुवात त्यांनी केली. एक नंबर असलेल्या पक्षाने ‘फोडाफोडी'चे राजकारण करु नये, असा सल्ला शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी दिला आहे. एकूणच सध्या शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये एकमेकांवर सुरु असलेल्या कुरघोड्या पाहता आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्यास महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कॉंग्रेस निवडून येईल – संध्या सव्वालाखे