दिव्यांगांना महापालिकातर्फे सर्वतोपरी मदत - आयुक्त अनमोल सागर

भिवंडी : भिवंडी शहरातील दिव्यांगांना महापालिका प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असून, महापालिकाकडून सुरू करण्यात आलेल्या दिव्यांग पोर्टलवर दिव्यांग नागरिकांनी आपली माहिती भरुन योग्य तो लाभ घ्यावा, असे आवाहन भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी केले आहे.

‘जागतिक दिव्यांग दिन' निमित्ताने भिवंडी महापालिका मुख्यालयात समाज कल्याण विभाग अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या दिव्यांग कार्यालयाच्या आणि दिव्यांग पोर्टलच्या उद्‌घाटनप्रसंगी आयुवत सागर बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, नयना ससाणे, उपायुक्त विक्रम दराडे, सहाय्यक आयुक्त शैलेश दोंदे, ‘दिव्यांग सेवा संस्था'चे  अशोक भोईर, नरेश तरे, तसेच महापालिका सेवेतील दिव्यांग कर्मचारी आणि शहरातील दिव्यांग संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यांग समाजातील सर्वात मोठा घटक आहे. त्यांना सर्व प्रकारच्या समान संधी उपलब्ध करुन देणे, त्यांना मदतीचा हात पुढे करणे, त्यांच्या कामात त्यांना योग्य ती मदत करणे तसेच शासन नियमाप्रमाणे आणि महापालिका निर्णयनुसार दिव्यांग व्यक्ती  यांना लाभ देण्यात येतील, असे देखील आयुक्त अनमोल सागर यांनी नमूद केले.

महापालिकेने सुरु केलेल्या ‘दिव्यांग पोर्टल'च्या माध्यमातून दिव्यांगांना घरबसल्या आपली नोंद करता येणार असून शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. या सेवांचा लाभ दिव्यांगाने घ्यावा, असे आवाहनही आयुक्त अनमोल सागर यांनी केले.

यावेळी महापालिका सेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण विभागप्रमुख मिलिंद पळसुले यांच्या नेतृत्वाखाली विभागातील समीर मुंढे, अमीन अन्सारी, अमोल देसले, आदि कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यांग कर्मचारी अलका मटाले यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

१२ व्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक' एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला सुरुवात