उल्हासनगरसाठी ‘भाजपा'चा निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘भाजपा'तर्फे उल्हासनगर जिल्हा कार्यालयात निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. आमदार कुमार आयलानी, शहर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया तसेच निवडणूक निरीक्षक प्रदीप रामचंदानी यांच्या हस्ते संयुक्तपणे या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
‘एक भारत-श्रेष्ठ भारत' या संकल्पनेवर आधारित या जाहीरनाम्यात उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आणि दूरदृष्टीपूर्ण आराखडा मांडण्यात आला आहे. शहर स्वच्छ, सुरक्षित, सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी ठोस आणि नियोजनबध्द विकासकामांवर भर देण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात मुलभूत नागरी सुविधांचा विस्तार, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रस्ते आणि वाहतूक सुधारणा, शिक्षण-आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी यांना प्राधान्य देण्यात आले आहे. उल्हासनगरला एक आदर्श आणि विकसित महानगर म्हणून उभे करण्याचा ‘भाजपा'चा ठाम संकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा थेट लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिकेत ‘भाजपा'चे सक्षम आणि मजबूत नेतृत्व आवश्यक आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत ‘भाजपा'च्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
शहरवासीयांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन सदर जाहीरनामा तयार करण्यात आला असून निवडणुकीत यश मिळाल्यानंतर जाहीरनाम्यात दिलेल्या प्रत्येक वचनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भाजप पूर्णपणे कटिबध्द राहील, असे राजेश वधारिया यांनी सांगितले.