भंगारच्या नावाखाली ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश ; ७ जण जेरबंद

नवी मुंबई : भंगार विक्रीच्या व्यवसायाचा आडोसा घेऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने नेरुळ रेल्वे पटरी लगत असलेल्या झोपडीवर धाड टाकून तब्बल २२ लाख रुपये किंमतीचे हिरोईन आणि गांजा जप्त केला आहे. तसेच या तस्करीत सहभागी असलेल्या ७ आरोपींना अटक केली आहे.  

नेरुळ, सेक्टर२८ मधील रेल्वे पटरी जवळ राजू राठोड नावाचा व्यक्ती आपल्या नातेवाईकांच्या मदतीने भंगार विक्रीच्या नावाखाली अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली ४ पोलीस अधिकारी आणि १५ पोलीस अंमलदारांच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास नेरुळ, सेक्टर-२८ मधील रेल्वे रुळालगत च्या संशयित झोपडीवर छापा टाकला.  

यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत सदर झोपडीत तब्बल २२ लाख रुपये किंमतीचे ४३.६ ग्रॅम हिरोईन तसेच २६ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी सदरचा गांजा जप्त करुन अंमली पदार्थाच्या तस्करीत सहभागी असलेल्या राकेश सचिन वाघरी (१८), राजेंद्र भीमा काळे (५५), अनिता संजय पवार (२९), राजू बाबू राठोड (२८), शिवराम लक्ष्मण पवार (३२), कमळाबाई बाबू राठोड (५५), सुमन राजू राठोड (२५) या ७ जणांना ताब्यात घेऊन असून त्यांच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अटकेत असलेला मुख्य आरोपी राजू राठोड सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नेरुळ पोलीस ठाण्यात मारहाण आणि चोरी, घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी राजू राठोड याचे भंगार दुकान अनधिकृत जागेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम तातडीने निष्कासित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवी मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी विशाल आणि गंगा काळे या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ॲक्टीव्हाच्या वाकवलेल्या नंबरप्लेटमुळे ड्रगडिलरचे नेटवर्क उध्वस्त