महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी

भाईंदर : विविध तांत्रिक कारणास्तव गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मिरा-भाईंदर महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश नवनिर्वाचित महापौरांनी दिल्याने महापालिका सेवेत लिपिक आणि इतर पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावून अनेक विषयांवर चर्चा केली. तसेच कामांचा आढावाही घेतला. महापालिका सेवेत लिपिक आणि इतर पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंत एकाच पदावर काम करावे  लागत आहे. यात विविध तांत्रिक बाबी असल्याने त्या दूर करुन तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर मेहता यांनी दिले. तसेच शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवरुन त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांची कानउघाडणी करुन आता अशा प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

शासकीय भूखंड आणि खासगी मोकळ्या जमिनीवर सुरू असलेल्या बेकायदा झोपड्यांची बांधकामे, दुरुस्ती परवानगीच्या आडून वाढीव बांधकाम करणे, जुने बांधकाम दाखवून मोकळ्या जागेत इमारत उभारणे असे प्रकार सुरु असल्याबाबत महापौर डिंपल मेहता यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच येत्या काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर महासभेत निलंबनाचा प्रस्ताव आणून कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. यामुळे महापौर डिंपल मेहता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील उद्या ११ फेब्रुवारी रोजी महापालिकेतील दालनात कार्यभार स्वीकारणार आहेत.

वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्याचे निर्देश...
मिरा-भाईंदर महापालिकेचा २८ फेब्रुवारी रोजी येणारा वर्धापन दिन लोकप्रतिनिधी नसल्याने काही वर्षांपासून साध्या पध्दतीने साजरा केला जात होता. यावर्षी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना महापौर डिंपल मेहता यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित शेतकरी मोबदल्यापासून वंचित