सिंगापूर, जर्मनी, एस्टोनिया मधील विद्यार्थ्यांची नवी मुंबइला अभ्यास भेट
नवी मुंबई : नवी मुंबई शहराची ओळख आधुनिक शहर म्हणून सर्वदूर असून अनेक देशी-परदेशी अभ्यासक, विद्यार्थी नवी मुंबई शहराला भेटी देऊन नवी मुंबईतील नाविन्यपूर्ण प्रकल्प, उपक्रम यांची माहिती घेत असतात. अशाच प्रकारे ११ डिसेंबर रोजी सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थी समुहाने नवी मुंबई महापालिका मुख्यालयास भेट देऊन विविध प्रकल्प, कामांची माहिती आणि त्यामधील वेगळेपण जाणून घेतले.
रिलायन्स फाऊंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ॲण्ड रिसर्च या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीच्या २० विद्यार्थी समुहाने नवी मुंबई महापालिका मुख्यालयास भेट दिली. यावेळी महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी महापालिका सल्लागार समुहाने महापालिका क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांची आणि उपक्रमांची माहिती अभ्यासगटास दिली. यामध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापन, मलनिःस्सारण व्यवस्थापन, घनकचरा संकलन-प्रक्रिया व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर, दैनंदिन स्वच्छता. प्रदूषण प्रतिबंधात्मक कार्यवाही, स्वच्छताकर्मींना वेळोवेळी दिले जाणारे प्रोत्साहन, व्यसनमुक्तीसह जनजागृती, आरोग्य सेवा-सुविधा, बांधकाम-पाडकाम साहित्यापासून पेव्हर ब्लॉक तयार करणे, प्लास्टकमुक्त शहरासाठी करण्यात येणा-या उपाययोजना, वस्त्र कच-यावरील पुर्नप्रक्रिया प्रकल्प अशा विविध प्रकल्पांबरोबरच सुक्या कचऱ्यापासून वीज निर्मिती, ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस अशा संभाव्य प्रकल्पांबाबत देखील तपशीलवार सादरीकरण करुन माहिती देण्यात आली.
अशाचप्रकारे १० डिसेंबर रोजीही रायन इंटरनॅशनल स्कुलच्या माध्यमातून जर्मनी आणि इस्टोनिया या दोन देशांतील ४० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयास भेट देऊन शहराच्या वैशिष्ट्यांची माहिती जाणून घेतली.या तिन्ही देशांमधील महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासगटांनी भारतातील शहरांमध्ये जाणवणारे नवी मुंबईचे वेगळेपण अधोरेखित केले असून अनेक वेगळ्या गोष्टी अनुभवता आल्या, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.