रस्त्यावर वाहणाऱ्या घाणेरड्या सांडपाण्याने दुर्गंधी
भिवंडी : भिवंडी महापालिका प्रभाग समिती क्रमांक-४ अंतर्गत येणाऱ्या फाल्कन हॉटेल ते सुपर बिल्डींग पर्यंतचा संपूर्ण रस्ता तुंबलेल्या आणि तुटलेल्या गटारांमुळे सतत सांडपाण्याने भरलेला असतो. रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून त्याने संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
सदर मार्गाने दररोज शेकडो शाळकरी मुले जातात. त्यांना घाणेरड्या पाण्यातून जावे लागते. दिवाणशाह दर्गा आणि बाबू चुन्नीवली इमारतीकडे सदर रस्ता जातो. बाबू चुन्नीवली इमारतीजवळील दैनिक बाजारपेठेत नेहमी महिलांची मोठी गर्दी असते. रस्त्यावर सतत साचणाऱ्या गटारामधील पाण्यामुळे संपूर्ण रस्ता चिखल आणि घाणीने भरलेला आहे. साचलेल्या पाण्यामुळे रस्ता निसरडा झाला असल्याने अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी सोहेल खान यांनी या भयानक परिस्थितीचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे घाणेरड्या सांडपाण्याचे सदर प्रकरण लोकांसमोर उघडकीस आले.
गटारांचे पाणी रस्त्यावर कसे वाहत आहे? ते या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. लोकांना घाणीतून चालावे लागत आहे. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, वारंवार तक्रारी करुनही त्यांना महापालिका प्रभाग कार्यालयातून केवळ आश्वासने मिळाली आहेत. मात्र, प्रत्यक्षात ठोस सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. गटार आणि रस्त्यांची त्वरित दुरुस्ती न झाल्यामुळे संपूर्ण परिसरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे. रस्त्यावर वाहणारे गटाराचे पाणी केवळ वाहतुकीला अडथळा आणत नाही तर गंभीर आजार पसरण्याचा धोका देखील निर्माण करीत आहे. रस्त्याच्या अशा परिस्थितीमुळे परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे.
दरम्यान, सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तात्काळ साफसफाईचे आदेश स्वच्छता विभागास देण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विक्रम दराडे यांनी दिली आहे.