नवी मुंबईत थर्टीफस्ट आणि नववर्ष स्वागत शांततेत साजरा
नवी मुंबई : थर्टी फस्टच्या मध्यरात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र नवी मुंबई पोलिसांकडुन थर्टीफस्टच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या ड्रँक ऍन्ड ड्राईव्ह च्या मोहिमेत मद्य प्राशन करुन वाहन चालविणारे 250 तळीराम पोलिसांच्या हाती लागले आहेत. या सर्वांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई कली आहे. त्याशिवाय पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया 3550 वाहन चालकांवर देखील कारवाई कारवाई केली आहे.
याहीवर्षी नवी मुंबईकरानी मोठया जल्लोषात आणि धुमधडाक्यात नववर्ष साजरा केला. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच महामार्गावरील टोल नाके, शहरातील महत्वाचे चौक,सिग्नल,जंक्शन अशा विविध ठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे शहरात थर्टी फस्टच्या मध्यरात्री कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. थर्टीफस्ट आणि नववर्ष शांततेत साजरा झाल्याने पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला आहे.
दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी थर्टी फस्टच्या बंदोबस्तादरम्यान, तसेच नाकाबंदी दरम्यान, मद्य पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक आणि भरधाव वाहने चालणाऱ्या वाहन चालकांची गुरुवारी पहाटे पर्यत तपासणी केली. या तपासणीत 250 तळीराम सापडल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी दिली. या कारवाई बरोबरच वाहतुक पोलिसांकडुन विना हेल्मेट दुचाकीवरुन फिरणारे-,सिटबेल्ट न लावता फिरणारे, तसेच दुचाकीवरुन ट्रिपल सिट फिरणारे आदी वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 3550 वाहन चालकांवर मोटार वाहन कादयान्वये कारवाई करण्यात आल्याचे काकडे यांनी सांगितले.
तसेच यापुढील काळात देखील वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करुन बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱया वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतुक विभागाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, तसेच वाहतुक सुरळीत ठेवण्यास नवी मुंबई वाहतुक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिमंडळ-1 मध्ये थर्टीफस्टच्या रात्री बेकायदेशीर कृत्य करणाऱयांवर कारवाई
परिमंडळ-1 वाशीच्या हद्दीमध्ये परिमंडळ-1चे पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बंदोबस्तादरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाऱया व्यक्तींवर व नियमभंग करणाऱया आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक मार्गावर अडथळा निर्माण करणारे-21, सार्वजनिक ठिकाणी ज्वालाग्राही पदार्थाचा निष्काळजी वापर करणारे-20, बेकायदेशीर मद्यपी करणारे-3, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱया-38 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. याशिवाय एनडीपीएस कायद्यान्वये-17, मद्यप्राशन करुन वाहन चालविणारे 55 वाहन चालक, कोटपा कायद्यान्वये 47 व्यक्तींवर तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱया 250 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे थर्टीफस्टच्या पार्श्वभुमीवर एकूण 451 व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.