‘शिंदे गट'चा गणेश नाईकांवर जोरदार हल्लाबोल
नवी मुंबई : ‘शिवसेना शिंदे गट'च्या वतीने ९ जानेवारी रोजी नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. यावेळी झालेल्या ‘पत्रकार परिषद'मध्ये खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली.
खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत स्मार्ट सिटी प्रकल्प रद्द केल्याचा आरोप करत, ज्या लोकांनी स्वतःला ‘नवी मुंबई'चे शिल्पकार म्हणवून घेतले, त्यांनीच महासभेत स्मार्ट सिटी प्रकल्पाला नकार दिला. त्यामुळे हजारो कोटींचा निधी नवी मुंबई शहराला मिळू शकला नाही, असा दावा केला. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट सिटी अंतर्गत गार्डन, स्टेशन, खाडी पुनर्विकास, पाणीपुरवठा, नाले आदि प्रकल्प उभारले गेले; मात्र नवी मुंबईत पार्किंग, बस टर्मिनल, पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे ते म्हणाले.
नवी मुंबई महापालिकामध्ये ठेकेदारांचा आणि विशिष्ट कंपुचा एकाधिकार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका सर्वसामान्यांची झाली पाहिजे. १६ जानेवारीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही एकाधिकारशाही संपवू, असा निर्धार खा. म्हस्के यांनी व्यक्त केला.
शिवसेना नेते विजय नाहटा यांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप करत, बावखळेश्वरची ३९ एकर जमीन, ग्लास हाऊससाठी ४ एकर जमीन, तसेच पर्यावरणमंत्री असताना ३५० हेक्टर जमीन रेसिडेन्शियलमध्ये रुपांतरीत करण्याचे प्रकार दरोडेखोरीसारखेच आहेत, अशी घणाघाती टीका केली. अहंकारामुळेच लोक पराभवातूनही धडा घेत नाहीत, असेही नाहटा म्हणाले.
जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी ना. गणेश नाईक यांच्या कार्यपध्दतीवर टीका करत, सततच्या भांडणांमुळे नवी मुंबईचे मोठे नुकसान झाले. मेट्रो, पुनर्विकास, पाणीटंचाई, ट्रॅफिक जाम या प्रश्नांची किंमत नवी मुंबईकरांना मोजावी लागत आहे, असा आरोप पाटकर यांनी केला. ऐरोली परिसरातील अनधिकृत बांधकामांवरही त्यांनी बोट ठेवले.
दरम्यान, सदर ‘पत्रकार परिषद'मध्ये ‘शिवसेना शिंदे गट' नवी मुंबई महापालिका लोकाभिमुख करण्याचा संकल्प व्यक्त करत, येणाऱ्या निवडणुकीत जनतेने अहंकार आणि एकाधिकारशाहीला घरी बसवावे, असे आवाहन केले.