नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘भाजप'ला पहिला झटका

वाशी : येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणाऱ्या नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाधीच ‘भाजप'ला झटका बसला आहे. महापालिका निवडणुकीत वाशी प्रभाग क्रमांक-१७ अ मधील अधिकृत भाजप उमेदवार निलेश भोजने यांचा अर्ज बाद झाला आहे.त्यामुळे या प्रभागात आता शिवसेना उमेदवार आणि नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांचे पारडे जड झाले आहे.

नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, वैध आणि अवैध अर्जांची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. संपूर्ण महापालिका हद्दीत एकूण ९५६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. यापैकी ८३९ अर्ज वैध ठरले असून, ११७ अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरवण्यात आले आहेत.

नामनिर्देशन अर्ज छाननी प्रक्रियेत वाशी विभागातून एकमेव नामनिर्देशन अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वाशी विभागात दाखल झालेल्या १०२ अर्जांपैकी १०१ अर्ज वैध ठरले असून, फक्त एक अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. विशेष म्हणजे अवैध ठरलेला नामनिर्देशन अर्ज महापालिका प्रभाग क्रमांक-१७अ मधील भाजप उमेदवार निलेश भोजने यांचा आहे. नामनिर्देशन अर्ज बाद झाल्यामुळे प्रभाग व्रÀमांक-१७अ मधील निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणात बदलले असून, याचा थेट फायदा शिवसेना उमेदवार आणि शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर तसेच त्यांच्या पॅनेलला होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानाआधीच ‘भाजप'ला पहिला झटका बसला आहे.

दरम्यान, माजी शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र भोईर यांचा मुलगा दर्शन भोईर यांचे तिकीट कापल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता. त्यामुळे ‘भाजप'ने देखील दर्शन भोईर यांचा भाजप प्रवेश करवून घेत त्यांना भाजप पुरस्कृत उमेदवार जाहीर करुन पडलेल्या जखमेवर काही अंशी मलम लावले आहे.

नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक करिता एकूण ९५६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. यापैकी ८३९ अर्ज वैध ठरले असून, ११७ अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरवण्यात आले आहेत. नामनिर्देशन अर्ज छाननी प्रक्रियेत नेरुळ विभागात सर्वाधिक २८ अर्ज अवैध ठरले असून, घणसोली विभागात तब्बल ३९ अर्ज बाद झाले आहेत. या तुलनेत वाशी विभागात अत्यंत काटेकोर तयारीमुळे आणि अचूक कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे अवघा एकच अर्ज बाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नामनिर्देशन अर्ज छाननीनंतर आता आज २ जानेवारी रोजी होणाऱ्या माघार प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत अंतिम निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

वैध - अवैध उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे संख्या तपशील
बेलापूर - एकूण १३६ अर्ज : १२७ वैध /०९ अवैध
नेरुळ - एकूण १६२ अर्ज : १३४ वैध /२८ अवैध
वाशी - एकूण १०२ अर्ज : १०१ वैध /०१ अवैध
तुर्भे - एकूण १४५ अर्ज : १३१ वैध /१४ अवैध
कोपरखैरणे - एकूण १२३ अर्ज : १०५ वैध /१८ अवैध
घणसोली - एकूण ११३अर्ज : ७४ वैध /३९ अवैध
ऐरोली - एकूण ८९ अर्ज : ८३ वैध /०६ अवैध
दिघा - एकूण ८६ अर्ज : ८४ वैध /०२ अवैध
एकूण - ९५६ अर्ज दाखल : ८३९ वैध /११७ अवैध 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नमुंमपा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणेची सज्जता