नवी मुंबई आरटीओ तर्फे १६२ खाजगी बसेसवर कारवाई
तुर्भे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६२ खाजगी प्रवासी वाहतूक बसेसवर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय तर्फे कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मध्ये ४ लाख २६ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे, अशी माहिती नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रेय सांगोलकर यांनी दिली.
नवी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस प्रवासी चढ-उतार करत असतात. यामध्ये नवी मुंबई शहरातील वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ आणि सीबीडी येथील उड्डाणपुलांच्या जवळ तसेच एसटी महामंडळाच्या बस थांब्यावर खाजगी बसेस प्रवासी भरण्यासाठी उभ्या असतात. त्यामुळे खाजगी बसेस प्रवासी भरण्यासाठी उभ्या राहणाऱ्या ठिकाणी अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असते. याबाबत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मध्ये तसेच राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे देखील अनेक एसटी प्रवाशांनी तक्रार केली होती. या तव्रÀारींची दखल घेऊन ना. प्रताप सरनाईक यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार १ एप्रिल पासून नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय तर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक बसेसवर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीममध्ये १ एप्रिल पासून अद्यापपर्यंत १६२ खाजगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक बसेसवर धडक कारवाई करण्याची मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, असे दत्तात्रेय सांगोलकर यांनी सांगितले.
दरम्यान, खाजगी प्रवासी वाहतूकदारानी वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच एसटी महामंडळाच्या बस थांब्यालगत २०० मीटर पर्यंत प्रवासी चढ-उतार करु नये, असे आवाहन नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रेय सांगोलकर यांनी केले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक बसेसवर धडक कारवाई करण्याची मोहीम नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय तर्फे सुरु करण्यात आली असली तरी या कारवाईचा काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत असून, कारवाई नंतर देखील उड्डाणपुलांच्या जवळ तसेच एसटी महामंडळाच्या बस थांब्यावर खाजगी बसेस प्रवासी भरण्यासाठी उभ्या राहत असल्याचे चित्र दिसत आहे.