नवी मुंबईकरांनो सावधान!

नवी मुंबई : नवी मुंबई शहर सुरक्षित आणि शिस्तबध्द करण्यासाठी वाहतूक विभागाने कंबर कसली असून, २०२५ या वर्षात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ९ लाख ८० हजार ८०६ वाहन चालकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षाच्या (२०२४) तुलनेत कारवायांच्या संख्येत सुमारे ९३ हजारांनी वाढ झाली आहे. एकीकडे कारवायांचा आकडा वाढत असतानाच, अपघाती मृत्युच्या संख्येत झालेली घट शहरवासियांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे.

हेल्मेट नसलेल्यांवर सर्वाधिक कारवाई...
वाहतूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवरील कारवाईने उच्चांक गाठला आहे. २०२४ मध्ये १,७७,६२१ असणारा सदर आकडा २०२५ मध्ये २,०३,४३७ वर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ सिग्नल जंपिंगच्या केसेसमध्येही मोठी वाढ (४६,०७७ वरुन ७२,८६१) झाली असून, बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली आहे.

अपघातांत घट, जीव वाचवण्यात यश...
वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे रस्ते अपघातातील मृतांच्या संख्येत घट झाली आहे. २०२४ मध्ये २८६ जीवघ्ोणे अपघात झाले होते, ते २०२५ मध्ये २६७ वर आले आहेत. म्हणजेच १९ जणांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे. जखमींच्या संख्येतही २० ने घट झाली आहे.

कोटींची दंड वसुली; जनजागृती...
नवी मुंबई वाहतूक विभागाकडून केवळ दंड आकारणे असा उद्देश न ठेवता जनजागृतीवरही भर दिला जात आहे. २०२५ मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून तब्बल १४.८८ कोटी रुपयांचा तडजोड शुल्क वसूल करण्यात आला आहे. तसेच ‘लोक अदालत'च्या माध्यमातून ५.९६ कोटी रुपये दंड जमा झाला आहे. रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांनी वर्षभरात ३५९ बैठका घेतल्या. ४२५८ जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले. तसेच ४२ आरोग्य शिबिरांद्वारे चालकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे.

वाहतूक नियमांचे पालन करणे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आहे. सीसीटीव्ही आणि इंटरसेप्टर वाहनांच्या मदतीने नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-तिरुपती काकडे, पोलीस उपायुवत-नवी मुंबई वाहतूक विभाग. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी