‘सीईआयआर पोर्टल'द्वारे १५.४५ लाखांचे मोबाईल हस्तगत

पनवेल : पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या आणि गहाळ झालेल्या तब्बल १५ लाख ४५ हजार रुपये किंमतीच्या १०३ मोबाईल फोनचा शोध घेऊन सदर मोबाईल फोन पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना परत केले आहेत. हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने फिर्यादी नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करुन त्यांचे आभार मानले.

गहाळ झालेल्या मोबाइल फोनचा शोध घेण्याकरिता केंद्र सरकारने सीईआयआर (सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंटीटी रजिस्टर) असेे पोर्टल कार्यान्वित केले आहे. सदर पोर्टलचा वापर करुन नागरिकांच्या हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, पोलीस शिपाई विशाल दुधे, सचिन कोर तसेच इतर अंमलदारांकडून विशेष मोहिम राबविण्यात आली होती.

या शोध मोहिमेत पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन पनवेल हद्दीतून चोरीस गेलेल्या आणि गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा सीईआयआर पोर्टलवरुन आढावा घेऊन त्या मोबाईल फोनचा शोध घेतला. तसेच सीईआयआर पोर्टलचा वापर करुन मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास केला. या तपासात अनेक मोबाईल फोन भारतातील इतर राज्यात आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये वापरात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

त्यानंतर देखील पनवेल शहर पोलिसांनी अथक प्रयत्न करुन काही ठिकाणी स्थानिक पोलीसांची मदत घेवून एकूण १०३ नागरिकांचे चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले सुमारे १५ लाख ४५ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. तसेच संबंधित फोन मालकांना सदरचे मोबाईल फोन परत केले आहेत. दरम्यान, हरवलेला मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त्त करुन पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

५५ लाखांचा गुटखा जप्त, ३ चालकांवर कारवाई