पतंगोत्सव साजरा करा; पण खबरदारीने

मुंबई : मकरसंक्रतीच्या दिवशी नभात रंगबेरंगी पतंगा सगळीकडे बघायला एक वेगळाच आनंद येतो. पतंग आकाशात उंच भरारी घेऊ शकते. तो मजबूत; पण वजनाने हलक्या असलेल्या मांजामुळे. म्हणूनच अनेक लोक मांजाचाही निवड अत्यंत काळजी पूर्वक करतात. सदर सर्व तयारी करत असताना अनावधनाने आपल्याकडून एक खूप महत्वाची बाब दुर्लक्षित राहते, ती म्हणजे आपली आणि आपल्या प्रियजनांच्या सुरक्षेची.

पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास प्रसंगी जीव देखील गमवावा लागू शकतो, याचे भान राहत नाही. त्यामुळेच पतंग उडविताना काही दुर्घटना होणार नाही याची सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षिततेचे नियम पाळूनच पतंग उडवावेत, असे आवाहन ‘महावितरण'च्या भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी केले आहे.

पतंग उडविताना अपघात घडल्याच्या घटनांबाबतच्या बातम्या आपण दरवर्षी वाचतोच. पण, लोकांना नेहमीच असे वाटते की ते त्यांच्या बाबतीत घडणार नाही. शहरी भागात अपुऱ्या जागेअभावी अनेक जण घरच्या छतावर पतंग उडविताना आपल्याला दिसतात. पतंग उडविण्याच्या नादात कधी-कधी आपल्याला आपल्या घरावरुन गेलेल्या विजतारांचाही विसर पडतो आणि खबरदारी न घेतल्यामुळे अपघातही होतात. शिवाय, अडकलेले पतंग मिळवण्यासाठी तरुणांमध्ये जणू एक स्पर्धाच असते. अशावेळी शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करु नये. वीजतारांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो. सदर मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्कटि होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधीत परिसरात वीजपुरवठा खंडीत होण्याबरोबरच, त्या व्यक्तीचा शॉक लागून प्राणांतिक अपघात होण्याचाही धोका संभवतो.

त्यामुळे संक्रातीसारख्या आनंददायी सणाला योग्य खबरदारी घेवूनच पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा. त्यासाठी मोकळ्या जागेतच पतंग उडवावेत. पालकांनी दक्ष राहून मुलांना पतंग उडविण्यासाठी मार्गदर्शन करावेत, असे आवाहन मुख्य अभियंता संजय पाटील यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२७ गावांचा मुद्दा न मांडणाऱ्या उमेदवारांना मतदानादिवशी अद्दल घडविणार