कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त; कर वसुली खोळंबली
भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या कर निर्धारण विभागातील शेकडो कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्याने महापालिकेची कर वसुली पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे करदात्यांना कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सध्या महापालिकेच्या खात्यात ६ लाखांपेक्षा कमी कर जमा होत असल्याने महापालिका प्रशासनाची अवस्था आणखीनच बिकट होत आहे.
भिवंडी महापालिका कर आकारणी विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेची जुनी आणि नवीन मिळून एकूण ७१३ कोटी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, या वसुलीसाठी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी १२५ कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी मेहनत करुनही एप्रिल २०२४ ते ५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत सुमारे २६ कोटी रुपये वसूल होऊ शकले. याशिवाय दोन दिवसांनी ‘अभय योजना'ही राबविण्यात आली. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत आचारसंहिता लागू झाल्यानंतर १.३० कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे. त्यापैकी बहुतांश कर निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी भरल्यामुळे कररुपी महसूलाचा आकडा वाढला आहे.
वास्तविक दररोज ६ लाख रुपयांच्या आसपास वसुली होत असते. मात्र, ५ नोव्हेंबर रोजी सुमारे ५.७६ लाख रुपये महापालिकेच्या खात्यात जमा झाले आहेत, जे अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कर भरण्यात अडचण येत असल्याच्या तक्रारी वाढत आहे. महापालिकेच्या कार्यालयात निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी गेल्याचे कारण सांगितल्याने नागरिकांना कर न भरताच परतावे लागत आहे. परिणामी, नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे.
सध्या कर मुल्यांकन कार्यालयात एकूण १५ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, इतर कर्मचारी वसुलीला जात असल्याने सध्या केवळ दोनच महिला कर्मचारी कार्यालयात काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांच्या विभागाचे काम ठप्प झाले आहे. जे कर भरण्यासाठी येतात, त्यांना कर जमा करणेही शक्य होत नसल्याने थकीत कराची वसुली कमी झाली आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेच्या कर आकारणी विभागासह पाचही विभागीय समिती कार्यालयातील शंभरहून अधिक भूभाग लिपीक आणि कर आकारणी विभागाचे कर्मचारी निवडणूक ड्युटीवर रुजू झाले आहेत. त्यामुळे कार्यालये ओस पडली आहेत.
-सुधीर गुरव, कर निर्धारण विभाग प्रमुख, भिवंडी महापालिका.