रक्तदान हेच श्रेष्ठ दान!
ठाणे : एका व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताचे सर्व महत्त्वाचे घटक बाजुला करुन पाच लोकांचा जीव वाचविला जाऊ शकतो, असे म्हटले जाते. त्यामुळेच रक्तदान हेच श्रेष्ठ दान असे मानले जाते. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत होता. अशात दिवाळीला नातेवाईकांकडे जाऊन त्यांची विचारपूस करत त्यांना आठवणीत राहील, अशी भेट देण्यापेक्षा ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या प्रेरणादायी विचारातून दिवाळी निमित्ताने वि. सा. सामान्य रुग्णालय येथे भेट देऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत ६ नोव्हेंबर पासून पुढील एक आठवडा रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हील रुग्णालय, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ, ठाणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रेरणादायी विचारांना कृतीत आणून जनजागृतीचे उत्तम उदाहरण म्हणजे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांनी सर्वप्रथम रक्तदान करुन या शिबिराची सुरुवात केली.
याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. मृणाली राहुड, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. राजू काळे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, अधिसेविका प्रतिभा बर्डे या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आवाहन करुन जनजागृती केली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी उपस्थित सर्व रुग्णालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आणि रक्तदात्यांचे कौतुक करुन मनोबल वाढविले.
इच्छुक रक्तदात्यांनी, स्वयंसेवी संस्थांनी, महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा. गरजू रुग्णांना मदत करावी. रक्तदान करुन या सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.