३० हजार गिरणी कामगारांना शेलु गावात हक्काचे घर

कल्याण : गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न आता मार्गी लागला असून ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यावर असलेल्या शेलु गावाच्या परिसरात गिरणी कामगारांसाठी भव्य संकुल उभारण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात या संकुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.

१९८२ मधील तीव्र संपामुळे मुंबईतील कापड गिरण्या बंद पडल्या. त्यामुळे गिरणी कामगारांना अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागला. महाराष्ट्र सरकारने या गिरणी कामगारांना अनुदानित घरे मिळवून देण्यासाठी खासगी विकासकांच्या भागीदारीत ‘गिरणी कामगार घरकुल योजना' राबविली आहे. या योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाने शेलू येथे जागा निश्चित केली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, गिरणी कामगार संघर्ष समिती, रयतराज कामगार संघटना, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन आणि सेंच्युरी मिल कामगार एकता संघ या गिरणी कामगारांच्या प्रमुख संघटनांनी शेलू येथील ‘कर्मयोगी एव्हीपी रियाल्टी' यांच्या जागेची पाहणी करुन या जागेस मान्यता दिली आहे. तसे पत्र त्यांनी म्हाडा आणि शासनाच्या गृहनिर्माण विभागास दिले आहे.

गिरणी कामगारांच्या घरांसाठीची जागा निश्चित झाली असून आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम लवकरच सुरु केले जाणार आहे. या गृहसंकुलासाठी उल्हास नदीतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना देखील मंजूर करण्यात आली असल्याची माहिती ‘गिरणी कामगार संघर्ष समिती'चे अध्यक्ष प्रवीण घाग आणि सरचिटणीस प्रवीण येरुणकर यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विधानसभा निवडणुकीवर शेवा कोळीवाडा ग्रामस्थांचा बहिष्कार