कोकण आयुक्त अग्रवाल यांच्या हस्ते पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

कळंबोली : ‘महाराष्ट्र दिन'च्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागीय मुख्य ध्वजारोहण कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

सदर समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, आदि उपस्थित होते.

समारंभात विविध पोलीस आणि आपत्कालीन सेवांच्या पथकांनी संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यामध्ये राज्य राखीव पोलीस दल क्र.११, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस, महिला पोलीस, वाहतूक शाखा, अग्निशमन दल, पोलीस बँड पथक, श्वान पथक, बुलेट प्रुफ आणि बीडीडीएस वाहने, फायर रेस्क्यू बाईक, निर्भया पथक, आणि रस्ता सुरक्षा अभियान पथक आदिंचा समावेश होता. सदर संचलन अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने पार पडले.

उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव...

पोलीस विभागाच्या विविध शाखांमधील पोलीस उपअधीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील,  सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र राऊत, पोलीस हवालदार  संजय तांडेल, पोलीस हवालदार सचिन शेवाळे, पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार, पोलीस हवालदार सचिन कडू , पोलीस नाईक अभय सांगळे तर सी सेवा पदक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम नागरे, पोलीस नाईक पृथ्वीराज घोरपडे या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना  त्यांच्या सेवाकालावधीत त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी भारत सरकार तर्फे होणाऱ्या जनगणना -२०२७ प्रथमच नागरिकांना स्वगणना म्हणजेचे स्वतःची माहिती स्वतः ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याची सुविधा आजपासून करुन देण्यात आली आहे. स्वगणना १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत करावयाची आहे. या माहिमेचा शुभारंभ पनवेल महापालिकेच्या वतीने विभागीय आयुक्त अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर कार्यक्रमास अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग सिध्दाराम सालीमठ, अपर आयुक्त (सामान्य) फरोग मुकादम, सह आयुक्त (नियोजन)  प्रमोद केंभावी, सहआयुक्त (पुर्नवसन) रवि पाटील, सहआयुक्त (करमणूक-शुल्क) रविद्र पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आदी विविध शासकीय अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे परिवहन सेवेच्या तापयात डबलडेकर बस