सायन-पनवेल महामार्ग, शहरातील मुख्य रस्त्यांवर डीप क्लिनींग मोहीम
सीबीडी : स्वच्छ नवी मुंबई शहर सर्व दृष्टीने स्वच्छ असावे याकरिता दररोजच्या नियमित स्वच्छतेप्रमाणेच शनिवार आणि रविवार या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने दुर्लक्षित आणि पडीक जागांची तसेच महापालिकेच्या अखत्यारीत नसलेल्या सायन-पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पदपथांच्या कडेला घट्ट झालेली माती तसेच झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या आणि पालापाचोळा यांची बारकाईने स्वच्छता करण्यात आली.
नेरुळ येथील एलपी जंक्शनपासून नेरुळ रेल्वे स्टेशन आणि नेरुळ रेल्वे स्टेशन ते हावरे जंक्शन तसेच हावरे जंक्शन ते अपोलो जंक्शन अशा सर्व बाजुंच्या मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. त्याचप्रमाणे सायन-पनवेल हायवेवरही साफसफाई करण्यात आली.
विशेष म्हणजे पालापाचोळा आणि कचरा उचलून झाल्यानंतर महापालिकेच्या अत्याधुनिक फॉगर्स मशीनद्वारे स्वच्छ केलेले पदपथ, रस्ते आणि दुर्लाक्षित जागा पाणी मारुन स्वच्छ करण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या मलप्रक्रिया केंद्रातून शुध्द केलेल्या प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात आला. अशाप्रकारे फॉगर्स वाहनाद्वारे रस्ते सफाई केल्याने हवेतील धुळीचे प्रमाण कमी होऊन प्रदुषणही कमी होणार आहे. अशाच प्रकारची सखोल स्वच्छता मोहीम तुर्भे विभाग कार्यालय परिसरातही राबविण्यात आली. नियमित स्वच्छतेप्रमाणेच अशा प्रकारच्या डीप क्लिनिंग मोहिमा राबवून नवी मुंबई परिसरातील सर्वांगीण स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे.