महेंद्र कोंडे यांच्या ‘बिलोरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन

ठाणे : ग्रंथाली या ग्रंथप्रसाराला वाहिलेल्या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वाचक दिनी ‘ज्ञानपीठ' या साहित्यातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या शुभहस्ते आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कवी तथा नवी मुंबई महापालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांच्या बिलोरी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ठाणे येथील बाळासाहेब ठाकरे संकुलात संपन्न झाले.

यावेळी कवी किरण येले यांच्या ‘बाई बाई गोष्ट सांग अर्थात बाईच्या कविता-२', कवी मोहन काळे यांच्या ‘अखेर मी माझीच समजूत घातली' या काव्यसंग्रहांचे तसेच लेखक नीलकंठ कदम यांच्या ‘कविता : आस्वाद आणि समीक्षा' या कवितेवरील समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी ग्रंथालीचे विश्वस्त .सुदेश हिंगलासपूरकर, बिलोरी काव्यसंग्रहाला पूरक ब्लर्ब लिहिणाऱ्या लेखिका निर्मोही फडके व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी चित्रकार विजयराज बोधनकर मंचावर डॉ.भालचंद्र नेमाडे यांचे प्रत्यक्ष पोट्रेट काढत असताना कुमार केतकर यांनी त्यांच्याशी अनौपचारिक संवाद साधला. साक्षरतेमुळे माणूसपण संपत चालले आहे, माणसांमध्ये अनेक दुर्गुण येत असून माणसे जितकी साक्षर होत चाललीहेत तितकी लबाड होताहेत असे सांगत डॉ. नेमाडे यांनी आता निरक्षरता शिकविण्यासाठी विद्यापीठांची गरज असल्याचे मत व्यक्त करीत सद्यस्थितीवर उपरोधिक भाष्य केले. मातृभाषा मराठीचे महत्व, खरा माणुसकी धर्म यावर इतिहासातील दाखले देत त्यांनी उद्‌बोधक विचारपट खुला केला.

कवी महेंद्र कोंडे यांचा ‘बावनकशी' या काव्यसंग्रहानंतरचा ‘बिलोरी' दुसरा कवितासंग्रह असून यामध्ये प्रेमातील विविध भावभावना, जाणीवा, आंदोलने यांचे तरल चित्रण आहे. सध्याच्या जीवन व्यवहारात प्रेम एकूणच गुळगुळीत झालेल्या  नाण्यासारखे वाटत असले तरी बिलोरी मधील कवितांमधून प्रेम कचकड्यासारखे न भासता ते बिलोर म्हणजे स्फटिकासम शुध्द होऊन येते, असे मत लेखिका डॉ. निर्मोही फडके यांनी मांडले आहे. त्यामुळेच सदर कविता दिसायला नाजूक; पण जीवन जाणिवांचे आघात पचवून रसरशीतपणे जगणारी, जगायला उन्मुख करणारी तसेच हृदयातील भावकोमल कोशांना उमलविणारी असून काव्यसंग्रह सर्व कविताप्रेमींसाठी बिलोरी भेट असल्याचे डॉ. फडके म्हणाल्या.

प्रकाशन समारंभप्रसंगी महेंद्र कोंडे यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित होणे भाग्ययोग असल्याचे सांगून रसिकांची दाद घेत दोन कविता सादर केल्या. याप्रसंगी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सायन-पनवेल महामार्ग, शहरातील मुख्य रस्त्यांवर डीप क्लिनींग मोहीम