मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला बगल; अधिकारी, माफिया गब्बर
ठाणे : ठाणे तलावांचे शहर मात्र या शहराची ओळख बदलत चालली आहे. सुंदर-स्वच्छ ठाणे आजच्या स्थितीला अनधिकृत इमारतींचे, अनधिकृत होर्डिंगचे शहर ठरत आहे. ठाण्यात खूपकाही अनधिकृत आहे. यातून मिळणाऱ्या काळ्या मायेने ठाणे महापालिकेचे संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभागाचे उपायुक्त गब्बर झालेले आहेत. अनेक तक्रारीनंतरही कुठलीच कारवाईची अपेक्षा आता ठाणेकरांना, तक्रारदारांना राहिलेली नसल्याच्या संबंधितांच्या प्रतिक्रिया आहेत.
अनधिकृत इमारतीवर हातोडा मारा असे निर्देश तत्कालीन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही त्यांच्या आदेशाला बगल देऊन ठाणेमध्ये ८ माळ्याच्या इमारती मापालिका अधिकाऱ्यांच्या संरक्षणात उभ्या राहिल्या. अन् आज देखील अनधिकृत इमारतींची कामे सुरु आहेत. प्रत्येक प्रभाग समितीत किमान २-५ अनधिकृत इमारतींचे निर्माण होत आहे. २ माळ्याच्या इमारती असताना केलेल्या तक्रारींवर आज या इमारती ८-८ माळ्याच्या झाल्या; मात्र कारवाई शून्य. तक्रारीनंतर अधिकारी भूमाफियाशी नोटीस नोटीसचा खेळ खेळतात. इमारतींच्या सोबतच आता ठाणेमध्ये अनधिकृत होर्डींगचे पेव फुटलेले आहे. शहरात लोखंडी अवजड मोठ्या होर्डिंग्जची भरमार झालेली आहे. तक्रारदार तक्रारी करतात; मात्र कारवाई होत नसल्याचा त्यांचा सूर आहे.
लकी कंपाऊंड दुर्घटनेचा विसर...
ठाणे महापालिकेच्या हद्दीत मुंब्रा परिसरात घडलेल्या लकी कंपाऊंड दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता. अनधिकृत इमारत पत्यासारखी कोसळली. मात्र, या दुर्घटनेतून महापालिका प्रशासनाला याचा विसर पडलेला असल्याचे चित्र आहे. तेव्हापासून आतापर्यंत ८ महिन्यात ८स्लॅब टाकून इमारतीत रहिवाशी घुसवण्याचे माफियांचे षडयंत्र सुरु आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनेक आमदारांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. मात्र, माफियांची कामे राजरोसपणे सुरु आहेत. भाजपा आमदार संजय केळकर यांच्यासह अनेक पक्षांनी अनधिकृत इमारतींचे प्रश्न विधी मंडळात उपस्थित केले. तरीही शेकडो अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आणि राहत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात लोकमान्य सावरकर प्रभाग समितीत जाधव नामक व्यवतीने ८ माळ्याची इमारत बनविली. नंतर दुसऱ्या इमारतीचे काम सुरु करुन त्यातही ८ माळे उभारले. तर दुसरीकडे माजिवाडा-मानपाडा नौपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत कोलशेत येथे भूमाफियाने शासकीय नियम पायदळी तुडवून तब्बल ७-८ इमारतीचे बांधकाम सुरु आहे. तर दिव्यात एक डझन इमारतीचे कामे सुरु आहेत. या बाबतीत मुंब्रा देखील मागे नाही.
भविष्यात लकी कंपाऊंडची पुनरावृत्ती...
गेल्या काही महिन्यांपासून ८ माळ्याच्या तयार होणाऱ्या इमारती येत्या काळात लकी कंपाऊंड दुर्घटनेची नांदी ठरु शकतात. या अनधिकृत इमारती मृत्युचे सापळे होण्याची शक्यता तक्रारदार आणि माहितीचा अधिकार कार्यकर्त्या प्रियांका शाद यांनी व्यक्त केली आहे. शहराच्या विद्रुपीकरणासोबतच शहराची ओळख बदलण्याचे कलंकित कृत्य महापालिका अधिकारी आणि अनधिकृत बांधकाम माफिया करीत आहे. याला लगाम लागू शकणार नसल्याचा विश्वासही शाद यांनी व्यक्त केला आहे. आ. संजय केळकर यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पत्रव्यवहार आणि तक्रारी केल्या. मात्र, कारवाई शून्य झाल्याने येणाऱ्या काळात ठाणेमध्ये लकी कंपाऊंड दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार आहे. कदाचित महापालिका प्रशासन नवीन दुर्घटनेची वाट पाहतेय काय? असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकरांना पडला आहे.
अनधिकृत इमारतीपाठोपाठ अनधिकृत होर्डिंगचाही विळखा...
आजच्या स्थितीला ठाणेमध्ये जवळपास ५० अनधिकृत नियमबाह्य, मनमानी कारभाराची होर्डिंगची भरमार झालेली आहे. याच होर्डिंगवर कागदोपत्री कारवाईचा दिखावा करण्यात आल्याचा आरोप ‘मनसे'चे ओवळा-माजिवडा विधानसभा विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. यासंदभात महापालिका आयुक्तांना चुकीचा आवाहल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत उच्च न्यायालयानेही ताशोरे ओढले आहेत. मात्र, होर्डिंगचा विळखा कायम असल्याचे चित्र आहे. यावर तब्बल ११ कोटींच्या दंडाची कारवाई केली गेेेली. मात्र, राजकीय दबावामुळे कारवाई बासनात गेल्याचा आरोप केला जात आहे.