उल्हासनगर मध्ये शून्य कचरा मोहीम
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभाग क्रमांक-१८च्या माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्या संकल्पनेतून ‘शून्य कचरा प्रभाग अठरा' मोहीम राबविण्यात येणार आहे. अंजली साळवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आयुक्त विकास ढाकणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शून्य कचरा मोहीम प्रभाग क्र.१८ मध्ये येत्या १ जानेवारी २०२५ पासून राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेची पूर्वतयारी म्हणून प्रभाग-१८ मध्ये काली माता मंदिर येथे स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, नागरिक आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कशाप्रकारे सदर मोहीम राबविण्यात येणार आहे, नागरिकांनी कशा प्रकारे ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करुन द्यावा याचे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच शून्य कचरा मिशन यशस्वीपणे सर्व भारतभर राबवणाऱ्या अर्चना मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन बैठकीला लाभले. अर्चना मोरे यांनी अत्यंत प्रभावीपणे पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे सर्व प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन तो आपल्याला घरातच कसा संपवता येईल, याबाबात मार्गदर्शन केले.
मिशन शून्य कचरा प्रकल्प अंतर्गत उल्हासनगर महापालिका आणि कोनार्क यांचे कर्मचारी कचऱ्याचे व्यवस्थित नियोजन करुन संपूर्ण ओला कचरा प्रभाग-१८मधील पीटस् मध्ये आणि कैलास कॉलनीच्या पीटस् मध्ये टाकून त्याचे खत तयार केले जाईल आणि सुका कचरा वेगळा दिल्या जाईल, अशाप्रकारे ८० ते ९० टवव्ोÀ कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल. तसेच शाळांमध्ये सुध्दा शून्य कचरा मिशन राबविण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल. अशा प्रकारे सदर मिशन प्रभाग क्र.१८ मध्ये यशस्वी झाल्यानंतर ते सर्वच प्रभागात राबवले जाईल.
अशाप्रकारे उल्हासनगर थोड्याफार प्रमाणात का होईना कचरा मुक्त होण्यास सुरुवात होऊ शकते. यामुळे डम्पिंग ग्राऊंडवरचा कचरा कमी होऊ शकतो. सद्य परिस्थितीत उल्हासनगरच्या डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपल्याने तिथे कचरा टाकण्यास जागाच नाही. तरी देखील सदर ठिकाणी कचरा टाकला जातो. त्यामुळे सदर प्रकल्प यशस्वी झाल्यास डम्पिंग ग्राऊंड हटविण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.
यावेळी महापालिकेच्या उपायुवत मयुरी कदम, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, आरोग्य विभागाचे अधिकारी हिवरे, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह प्रभाग-१८ मधील ‘सिटीझन फाऊंडेशन'चे प्रदीप कपूर, अनिल शर्मा, विशाल सोनवणे, संतोष मिंडे, अमोल राऊत, शिरीष पगारे, मालती गवई, प्रा. सिंधूताई रामटेके, मंगला मुजुमदार तसेच महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी स्वयंसेविका आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.